व्हिडिओ पाहण्यासाठी

गर्भपाताविषयी बायबल काय म्हणतं?

गर्भपाताविषयी बायबल काय म्हणतं?

बायबलचं उत्तर

 “गर्भपात” (जाणूनबुजून गर्भ पाडणं) हा शब्द बायबलमध्ये वापरलेला नाही. पण मानवी जीवनाबद्दल तसंच, जन्म न झालेल्या बाळाच्या जीवनाबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला बायबलच्या बऱ्‍याच वचनांवरून कळतं.

 जीवन ही देवाकडून एक देणगी आहे. (उत्पत्ती ९:६; स्तोत्र ३६:९) तो प्रत्येकाच्या, अगदी गर्भात असलेल्या बाळाच्या जीवनालासुद्धा मौल्यवान समजतो. त्यामुळे जर कोणी जाणूनबुजून जन्म न झालेल्या बाळाचा जीव घेतला तर देवाच्या दृष्टीने ती हत्याच आहे.

 देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात असं म्हटलं होतं: “माणसं एकमेकांशी मारामारी करत असताना, एखाद्या गरोदर स्त्रीला मार लागून तिचे दिवस भरण्याआधीच बाळाचा जन्म झाला, पण कोणतीही जीवहानी झाली नाही, तर अपराध्याला त्या स्त्रीच्या पतीने सांगितलेली भरपाई द्यावी लागेल; त्याने ती न्यायाधीशांच्या हातून द्यावी. पण जर जीवहानी झाली, तर जिवाबद्दल जीव दिला जावा.”​—निर्गम २१:२२, २३. a

 मानवाच्या जीवनाची सुरुवात कधीपासून होते?

 देवाच्या नजरेत एका मानवाच्या जीवनाची सुरुवात आईच्या पोटात गर्भ राहिल्यापासूनच होते. त्याच्या नजरेत गर्भातल्या बाळाचंसुद्धा अस्तित्व आहे, असं बऱ्‍याच वेळा त्याच्या वचनात म्हणजेच बायबलमध्ये सांगितलंय. गर्भातल्या बाळामध्ये आणि जन्मलेल्या बाळामध्ये देव फरक करत नाही याची काही उदाहरणं आता पाहू या.

  •   पवित्र शक्‍तीच्या प्रेरणेने दावीद राजा देवाला म्हणतो: “मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं.” (स्तोत्र १३९:१६) याचाच अर्थ, देव दावीदला त्याचा जन्म होण्याआधीपासूनच एक व्यक्‍ती म्हणून ओळखत होता.

  •   याशिवाय, यिर्मया संदेष्ट्याचा जन्म व्हायच्या आधीच देवाने त्याच्यासाठी एक खास नेमणूक राखून ठेवली होती. देव त्याला म्हणाला: “मी तुला आईच्या गर्भात घडवलं, त्याआधीच मी तुला ओळखत होतो. तुझा जन्म होण्याआधीच मी तुला पवित्र केलं. मी तुला राष्ट्रांसाठी संदेष्टा म्हणून नेमलं.”​—यिर्मया १:५.

  •   बायबलचा एक लेखक लूक, वैद्य होता. त्याने न जन्मलेल्या बाळासाठी आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी ग्रीक भाषेतला एकच शब्द वापरला.​—लूक १:४१; २:१२, १६.

 गर्भपात केलेल्या व्यक्‍तीला देव माफ करतो का?

 हो. गर्भपात केलेल्या व्यक्‍तीला देवाकडून माफी मिळू शकते. असं असलं तरी कदाचित तिचं मन तिला अजूनही खात असेल. पण जर त्या व्यक्‍तीने जीवनाबद्दल असलेला देवाचा दृष्टिकोन स्वीकारला असेल, तर ती खातरी बाळगू शकते की देव तिला माफ करेल. कारण बायबल म्हणतं: “यहोवा दयाळू आणि करुणामय आहे; . . . पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.” b (स्तोत्र १०३:८-१२) आपल्या पापांबद्दल खऱ्‍या मनाने पश्‍चात्ताप करणाऱ्‍या सर्वांना यहोवा माफ करतो; अशा लोकांनाही ज्यांनी गर्भपात केला आहे.​—स्तोत्र ८६:५.

 आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका असेल तरीसुद्धा गर्भपात करणं चुकीचं ठरेल का?

 डॉक्टर म्हणतील की आईला किंवा बाळाला पुढे जाऊन कदाचित शारीरिक समस्या उद्‌भवू शकतात. पण जन्म न झालेल्या बाळाच्या जीवनाबद्दल बायबल जे सांगतं त्यानुसार, अशा परिस्थितीतसुद्धा गर्भपात करणं योग्य ठरणार नाही.

 पण काही वेळा अचानक प्रसूतीच्या वेळी डॉक्टर म्हणतील की आई किंवा बाळ यांपैकी एकाचाच जीव वाचवला जाऊ शकतो. मग अशा वेळी काय करणं योग्य राहील? अशा वेळी कोणाचा जीव वाचवायचा हा निर्णय पूर्णपणे कुटुंबाचा असेल.

a बायबलच्या काही भाषांतरांमध्ये या वचनाचं ज्या प्रकारे भाषांतर केलंय त्यावरून असं वाटतं, की इस्राएली लोकांना दिलेल्या या नियमाप्रमाणे फक्‍त आईचा जीव महत्त्वाचा होता, तिच्या पोटातल्या बाळाचा नाही. पण मूळ हिब्रू भाषेत या वचनातून कळतं, की आई आणि बाळ या दोघांचाही जीव महत्त्वाचा आहे.

b बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा आहे असं म्हटलं आहे.​—स्तोत्र ८३:१८.