व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?

 आम्ही यहोवाचे साक्षीदार वाढदिवस साजरा करत नाही, कारण आम्ही मानतो की हे समारंभ देवाला आवडत नाहीत. वाढदिवस साजरा करणं चुकीचं आहे असं बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं नाही. पण वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या गोष्टी केल्या जातात त्या योग्य आहेत की नाही आणि देव त्यांबद्दल काय विचार करतो, हे समजून घ्यायला बायबल आपल्याला मदत करतं. वाढदिवसाबद्दल चार मुद्द्‌यांवर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या बायबल तत्त्वांवर आता आपण विचार करू या.

  1.  १. वाढदिवस साजरा करण्याची प्रथा खोट्या उपासनेतून आली आहे. जुन्या प्रथा, परंपरा आणि दंतकथा या विषयावर असलेल्या एका पुस्तकात असं सांगितलंय, की एखाद्याच्या वाढदिवसाला दुष्ट शक्‍ती किंवा दुरात्मे त्याच्यावर हल्ला करू शकतात असं पूर्वी लोक मानत होते. यातूनच वाढदिवसाच्या निमित्ताने पाळल्या जाणाऱ्‍या वेगवेगळ्या प्रथांना सुरुवात झाली. कारण त्या दिवशी मित्रपरिवार सोबत असल्यामुळे, तसंच त्यांच्या शुभेच्छांमुळे त्या व्यक्‍तीचं संरक्षण होईल असं लोकांना वाटायचं. द लोर ऑफ बर्थदेझ या पुस्तकात असं म्हटलंय, की “ज्योतिष-शास्त्राच्या आधारावर कोणत्याही व्यक्‍तीची जन्मपत्रिका बनवण्यासाठी जन्मतारखेची नोंद ठेवणं महत्त्वाचं होतं.” याच पुस्तकात पुढे असं म्हटलंय की “एखाद्याच्या वाढदिवसाला लावल्या जाणाऱ्‍या मेणबत्त्यांमध्ये चमत्कारिक शक्‍ती असते आणि त्यामुळे त्या व्यक्‍तीच्या इच्छा पूर्ण होतात असंही लोक मानायचे.”

     पण बायबल सांगतं की जादूटोणा, भविष्य सांगणं, भूतविद्या ‘आणि अशाच इतर गोष्टींची’ देवाला घृणा वाटते. (अनुवाद १८:१४; गलतीकर ५:१९-२१) खरंतर, बाबेल या प्राचीन शहरावर देवाने न्यायदंड आणला याचं एक कारण असं होतं, की तिथले लोक ज्योतिष सांगायचे. हा भविष्य सांगण्याचाच एक प्रकार आहे. (यशया ४७:११-१५) यहोवाचे साक्षीदार सगळ्याच प्रथांचा विरोध करत नाहीत. पण अमुक प्रथा देवाला आवडत नाही हे बायबलमधून स्पष्टपणे दिसून येतं, तेव्हा मात्र साक्षीदार त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत.

  2.  २. सुरुवातीचे ख्रिस्ती वाढदिवस साजरा करत नव्हते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात असं म्हटलंय की “त्यांच्या दृष्टीने कोणाचाही जन्मदिवस साजरा करणं ही खोट्या उपासनेची प्रथा होती.” बायबलमधून कळतं, की येशूचे प्रेषित आणि ज्यांना येशूने स्वतः शिकवलं होतं, त्यांची उपासनेची पद्धत पुढच्या काळातल्या सगळ्या ख्रिश्‍चनांसाठी एक उदाहरण होती.​—२ थेस्सलनीकाकर ३:६.

  3.  ३. ख्रिश्‍चनांना फक्‍त एकच दिवस पाळण्याची आज्ञा देण्यात आली आहे आणि तो दिवस जन्माशी नाही, तर येशूच्या मृत्यूशी संबंधित आहे. (लूक २२:१७-२०) याबद्दल आपल्याला नवल वाटायला नको, कारण बायबल म्हणतं की “जन्माच्या दिवसापेक्षा मरणाचा दिवस बरा.” (उपदेशक ७:१) येशूने पृथ्वीवरच्या त्याच्या जीवनात देवाच्या नजरेत चांगलं नाव कमवलं होतं, आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूचा दिवस हा त्याच्या जन्माच्या दिवसापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरला.​—इब्री लोकांना १:४.

  4.  ४. बायबलमध्ये देवाच्या कोणत्याही सेवकाने वाढदिवस साजरा केल्याचा उल्लेख नाही. बायबलचे लेखक याबद्दल उल्लेख करायला विसरले असावेत का? नाही. कारण बायबलमध्ये अशा दोन वाढदिवसांबद्दल सांगितलंय, जे देवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांनी साजरे केले होते. पण या दोन्ही घटना बायबलमध्ये वाईट उदाहरण म्हणून दिलेल्या आहेत.​—उत्पत्ती ४०:२०-२२; मार्क ६:२१-२९.

आपल्याला वाढदिवस साजरा करायला मिळत नाही याचं साक्षीदार कुटुंबांतल्या मुलांना वाईट वाटतं का?

 सगळ्या चांगल्या आईवडिलांप्रमाणेच साक्षीदार आईवडीलसुद्धा फक्‍त विशिष्ट दिवशीच नाही तर वर्षभर आपल्या मुलांवर असलेलं प्रेम व्यक्‍त करतात. ते त्यांना वेळोवेळी भेटवस्तू देतात आणि मित्रांना, नातेवाइकांना घरी बोलवून त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवतात. या बाबतीत ते देवाचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात, कारण तोसुद्धा आपल्या मुलांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी देतो. (मत्तय ७:११) आपल्याला वाढदिवस साजरा करायला मिळत नाही, याचं साक्षीदार कुटुंबांतल्या मुलांना वाईट वाटत नाही हे त्यांच्याच शब्दांवरून दिसून येतं:

  •   “गिफ्ट मिळणारए हे माहीत नसताना जेव्हा ते मिळतं तेव्हा जास्त आनंद होतो!”​—टॅमी, वय १२.

  •   “माझ्या वाढदिवसाला मला गिफ्ट मिळत नाहीत, पण माझे मम्मी-पप्पा इतर वेळी मला गिफ्ट देतात. मलाही ते आवडतं कारण अचानक गिफ्ट मिळतं तेव्हा खूप मस्त वाटतं.​—ग्रेगरी, वय ११.

  •   “दहा मिनिटांची पार्टी, केक आणि एक गाणं म्हणणं याला थोडीच पार्टी म्हणतात. खरी पार्टी काय असते ते माझ्या घरी येऊन पाहा!”​—एरिक, वय ६.