व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

दुःखातून बाहेर येण्यासाठी जर तुम्ही सल्ला शोधत असाल तर तुम्हाला कदाचित हजारो सल्ले सापडतील. त्यांपैकी काही मदतीचे ठरतील तर काही ठरणार नाहीत. पण असं का होऊ शकतं? कारण आधी चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येकाची शोक करण्याची पद्धत वेगळी असते. जो सल्ला एकाला उपयोगी ठरेल तो दुसऱ्‍यालाही उपयोगी ठरेल हे गरजेचं नाही.

असं असलं तरी, हे सिद्ध झालं आहे की असे काही मूलभूत सल्ले आहेत जे बऱ्‍याच जणांसाठी व्यवहारोपयोगी ठरले आहेत. सल्लागारांनी अनेकदा यांचा उल्लेख केला आहे. हे असे सल्ले आहेत जे बुद्धीचा खजिना असलेल्या एका प्राचीन पुस्तकातल्या तत्त्वांशी मेळ खातात. हे पुस्तक म्हणजे बायबल. यात दिलेली तत्त्वं आजही फायदेकारक आहेत.

१: मित्रपरिवाराकडून मदत स्वीकारा

  • काही तज्ज्ञ म्हणतात की दुःखातून सावरण्यासाठी हा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. असं असलं तरी तुम्हाला कधीकधी एकटं राहावंसं वाटू शकतं. काही वेळा तर तुम्हाला मदत करणाऱ्‍यांची चीडही येऊ शकते. पण असं वाटणं स्वाभाविक आहे.

  • लोक नेहमी तुमच्या अवतीभवती असायलाच हवेत असा विचार करू नका. पण असाही विचार करू नका की ‘मला कोणीच नको.’ कारण भविष्यात कधी न्‌ कधी तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज लागू शकते. तुम्हाला सध्या कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि कोणत्या नाही हे प्रेमळपणे त्यांना सांगा.

  • तुमच्या गरजेनुसार इतरांसोबत वेळ घालवण्यात आणि एकांत राहण्यात संतुलन राखा.

तत्त्व: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण . . . त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”​—उपदेशक ४:९, १०.

२: पौष्टिक आहार घ्या आणि व्यायामासाठी वेळ काढा

  • दुःखात असताना संतुलित आहार घेतल्यामुळे तणाव कमी करायला मदत होईल. आहारात वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या आणि कमी चरबीयुक्‍त अन्‍नाचा समावेश करा.

  • भरपूर पाणी आणि आरोग्याला पोषक असलेली पेयं प्या.

  • जर तुमची भूक कमी झाली असेल तर थोड्या-थोड्या वेळाने थोडा-थोडा आहार घ्या. तुम्ही काही न्युट्रिशन सप्लिमेंट्‌स a घेण्याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

  • भरभर चालण्याच्या आणि इतर प्रकारच्या व्यायामामुळे मनात नकारात्मक विचार येण्याचं कमी होऊ शकतं. तुमच्या जीवनात जो बदल झाला आहे त्यावर विचार करण्यासाठी किंवा प्रिय व्यक्‍तीची सतत आठवण येण्यापासून दूर राहण्यासाठी व्यायामामुळे मदत मिळू शकते.

तत्त्व: “कारण कोणताही मनुष्य स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही; उलट, तो त्याचे पालनपोषण करतो.”​—इफिसकर ५:२९.

३: पुरेशी झोप घ्या

  • चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची असते. पण ती खासकरून शोक करणाऱ्‍यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अशा वेळी खूप थकवा येऊ शकतो.

  • तुम्ही किती प्रमाणात चहा-कॉफी आणि मद्य घेता यावर लक्ष असू द्या. कारण या पदार्थांचा परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.

तत्त्व: “कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठीपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.”​—उपदेशक ४:६.

४: गरजेनुसार बदल करा

  • हे लक्षात असू द्या, की प्रत्येकाची दुःख व्यक्‍त करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे फायदा होईल हे शेवटी तुम्हालाच ठरवावं लागेल.

  • इतरांसमोर आपलं मन हलकं केल्यामुळे मदत झाल्याचं काहींनी अनुभवलं आहे, तर काही जणांना आपल्या भावना इतरांना सांगायला आवडत नाही. दुःखातून सावरायला हे कितपत फायदेकारक ठरतं यावर तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत. जर तुम्हाला तुमच्या भावना इतरांना सांगायला अवघड जात असेल तर सुरुवातीला तुम्ही जवळच्या एका मित्राला थोड्या-थोड्या गोष्टी सांगू शकता.

  • काही जणांना रडल्यामुळे त्यांचं दुःख हलकं करणं शक्य झालं आहे, तर काहींना सावरण्यासाठी याची गरज भासली नाही.

तत्त्व: “जर एखादा माणूस दुःखी असला तर फक्‍त त्यालाच ते दुःख जाणवत असते.”​—नीतिसूत्रे १४:१०, ईझी-टू-रीड व्हर्शन.

५: शरीराला हानीकारक असलेल्या सवयी टाळा

  • शोक करणारे काही जण आपलं दुःख कमी करण्यासाठी अती प्रमाणात मद्यपान करतात किंवा ड्रग्स घेतात. असे “सोपे मार्ग” धोकेदायक ठरू शकतात. शोक करणाऱ्‍याला वाटेल की त्याला अशा पदार्थांच्या सेवनामुळे बरं वाटत आहे, पण पुढे जाऊन त्याचे भयानक परिणाम होतात. तणाव दूर करण्यासाठी असे मार्ग निवडा ज्यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचणार नाही.

तत्त्व: “सर्व गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या.”​—२ करिंथकर ७:१.

६: वेळेचं नियोजन करा

  • अनेकांनी अनुभवलं आहे की ते जेव्हा अधूनमधून एखाद्या कामात काही वेळेसाठी व्यस्त राहतात तेव्हा त्यांना आपलं दुःख विसरायला मदत होते.

  • तुम्ही आपल्या मित्रांसोबत वेळ घालवू शकता, नवीन मित्रमैत्रिणी बनवू शकता, एखादं नवीन कौशल्य शिकू शकता किंवा थोडा वेळ मनोरंजन करू शकता. या गोष्टींमुळे तुम्हाला थोडं बरं वाटू शकतं.

  • जसजसा वेळ जाईल तसतसं तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीच्या तुलनेत जास्त वेळ शोक करण्यात घालवत नाही किंवा दिवसातून कमी वेळा दुःखी होता. आणि ही दुःखातून सावरताना घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.

तत्त्व: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो . . . रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो.”​—उपदेशक ३:१, ४.

७: नित्यक्रम ठेवा

  • लवकरात लवकर तुमच्या ठरलेल्या नित्यक्रमानुसार कामं करा.

  • तुमची झोपेची, कामाची किंवा इतर गोष्टींची ठरलेली वेळ असेल तर तुम्हाला कदाचित पूर्वीच्या स्थितीत यायला मदत होईल.

  • चांगल्या कामांत स्वतःला व्यस्त ठेवल्यामुळे दुःखी करणाऱ्‍या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

तत्त्व: “त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही; देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो.”​—उपदेशक ५:२०.

८: मोठे निर्णय घेण्यात घाई करू नका

  • आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावल्यानंतर लगेच मोठे निर्णय घेतल्यामुळे अनेकांना नंतर पस्तावा झाला आहे.

  • शक्य असेल तर थोडा वेळ थांबून निर्णय घ्या. मग तो निर्णय घर बदलण्याचा, नवीन नोकरी शोधण्याचा किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या वस्तू काढून टाकण्याचा असो.

तत्त्व: “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.”​—नीतिसूत्रे २१:५.

९: तुमच्या प्रिय व्यक्‍तीला विसरू नका

  • दुःखात असलेल्या अनेक लोकांना वाटतं की प्रिय व्यक्‍तीची आठवण ताजी राहील अशा गोष्टी करणं फायदेकारक ठरेल.

  • तुम्हाला कदाचित प्रिय व्यक्‍तीचा फोटो, तिची आठवण करून देणारी एखादी वस्तू किंवा काही चांगल्या घटनांच्या व गोष्टींच्या आठवणींची डायरी बनवल्यामुळे बरं वाटू शकतं.

  • अशा काही गोष्टी जतन करून ठेवा ज्यांमुळे चांगल्या आठवणी ताज्या होतील आणि मग थोडं सावरल्यानंतर तुम्ही त्या पाहू शकता.

तत्त्व: “पूर्वीच्या काळाचे दिवस आठवा!”​—अनुवाद ३२:७, सुबोध भाषांतर.

१०: कुठेतरी फिरायला जा

  • तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

  • जर तुम्हाला अनेक दिवसांसाठी फिरायला जाणं शक्य नसेल, तर तुम्ही एक-दोन दिवसांसाठी कुठेतरी जाऊ शकता. जसं की बागेत, समुद्रकिनारी किंवा मित्रांसोबत सहलीला.

  • थोड्या वेळासाठी वेगळं काहीतरी केल्यामुळेही तुम्हाला दुःखातून सावरायला मदत होऊ शकते.

तत्त्व: “एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”​—मार्क ६:३१.

११: इतरांना मदत करा

  • हे लक्षात असू द्या की जर तुम्ही इतरांना मदत केली तर तुम्हालाही  त्यामुळे मदत होऊ शकते.

  • अशा वेळी तुमच्या मित्रांना आणि नातेवाइकांनाही दुःख झालेलं असतं आणि त्यांनाही आधाराची गरज असते. तुम्ही कदाचित त्यांनाही मदत करू शकता.

  • इतरांना मदत केल्यामुळे आणि त्यांचं सांत्वन केल्यामुळे तुम्हाला नवा आनंद आणि एक असा उद्देश लाभेल ज्याची कदाचित तुम्हाला गरज होती.

तत्त्व: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”​—प्रेषितांची कार्ये २०:३५.

१२: महत्त्वाच्या गोष्टींवर पुनर्विचार करा

  • दुःखात असताना तुमच्या जीवनात खरोखर कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत हे समजायला तुम्हाला मदत होऊ शकते.

  • तुमचं जीवन तुम्ही कसं व्यतीत करत आहात यावर विचार करू शकता.

  • जीवनात कोणत्या गोष्टी पहिल्या स्थानी ठेवायच्या, यात गरजेनुसार फेरबदल करत राहा.

तत्त्व: “भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनांत ही गोष्ट बिंबून राहील.”​—उपदेशक ७:२.

खरं पाहता, कोणतीच गोष्ट तुमचं दुःख पूर्णपणे नाहीसं करू शकत नाही. पण शोक करणाऱ्‍यांनी काही मदतीची ठरणारी पावलं उचलली तर त्यांना जरूर सांत्वन मिळू शकतं. अशा काही सकारात्मक गोष्टींचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. आणि बरेच जण आपल्या अनुभवावरून सांगू शकतात की ही पावलं उचलल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे. पण हेही खरं आहे, की दुःखातून सावरायला मदतीची ठरणारी प्रत्येक गोष्ट वर दिलेली नाही. पण जर तुम्ही त्यांपैकी काही सल्ले लागू केले तर तुम्हाला नक्कीच खूप दिलासा मिळेल.

a सावध राहा!  कोणत्याही विशिष्ट उपचाराची शिफारस करत नाही.