व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन नक्कीच अर्थपूर्ण आहे!

जीवन नक्कीच अर्थपूर्ण आहे!

फैजलच्या पत्नीचा मृत्यू झाल्याच्या एका वर्षानंतर त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. फैजल म्हणतात: “बायबलमधलं ईयोब पुस्तक वाचल्यामुळे मला कळलं, की यहोवा देवाने नक्कीच एका कारणासाठी बायबलमध्ये या पुस्तकाचा समावेश केला आहे. आपल्या जीवनाशी संबंधित असलेलं एखादं उदाहरण आपण बायबलमध्ये वाचतो तेव्हा आपल्याला सांत्वन मिळतं की आपल्यासारख्याच भावना आणखीन एका व्यक्‍तीने अनुभवल्या आहेत.” पुढे ते म्हणतात: “परिस्थिती कितीही कठीण असो जीवनाला अर्थ आहे.”

तारशा तरुण असताना तिची आई वारली. ती म्हणते: “जीवनात अनेक समस्या असल्या तरीही सृष्टिकर्त्याला जाणल्यामुळे माझ्या जीवनाला उद्देश मिळाला आहे. तसंच, मला आशा आणि आनंद मिळाला आहे. आपण खात्री बाळगू शकतो की प्रत्येक दिवशी येणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि त्यातून निभावण्यासाठी यहोवा आपली मदत करेल.”

आधीच्या लेखांमध्ये आपण पाहिलं, की वेगवेगळ्या दुःखद प्रसंगामुळे जीवन जगणं खूप कठीण वाटू शकतं. आपल्या जीवनाला काही अर्थ नाही किंवा आपली कोणी काळजी करणारा नाही असं तुम्हाला तुमच्या व्यक्‍तिगत समस्यांमुळे वाटू शकतं. पण तुम्ही खात्री बाळगू शकता, की देव तुमचं दुःख समजून घेणारा आणि तुमची काळजी घेणारा आहे. तुम्ही त्याच्यासाठी मौल्यवान आहात!

बायबलमधलं ८६वं स्तोत्र लिहीणाऱ्‍याने देवावर भरवसा व्यक्‍त करत म्हटलं: “मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.” (स्तोत्र ८६: ७) तुम्ही विचार कराल की ‘देव “संकटसमयी” मला उत्तर कसं देईल?’

देव कदाचित आपल्या समस्या लगेच काढत नसला तरी त्याचं वचन, बायबल आपल्याला खात्री देतं की समस्यांना तोंड देण्यासाठी तो आपल्याला मनाची शांती देईल. त्याबद्दल बायबल म्हणतं: “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सर्व गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना व याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा; म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती . . . तुमच्या मनाचे व विचारांचे रक्षण करेल.” (फिलिप्पैकर ४:६, ७, तळटीप) देव कशा प्रकारे आपली काळजी घेतो हे आपल्याला पुढे दिलेल्या वचनांवरून कळतं.

देवाला तुमची काळजी आहे

“त्यांपैकी एकीलाही [एका चिमणीलाही] देव दुर्लक्ष करत नाही. . . . पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे.”​लूक १२:६, ७, तळटीप.

विचार करा: बऱ्‍याच लोकांच्या नजरेत चिमण्यांसारख्या लहान पक्ष्यांचं मोल नसतं, पण देव त्यांची काळजी करतो. अगदी लहान चिमणीकडेही देवाचं लक्ष असतं. सर्व सजीव प्राणी त्याच्यासाठी मौल्यवान आहेत. आणि मनुष्य हा चिमण्यांपेक्षा कितीतरी जास्त पटीने मौल्यवान आहे. देवाने पृथ्वीवर निर्माण केलेल्या सर्व सृष्टीमध्ये मानव हा सर्वोत्कृष्ट आहे. त्याने मनुष्याला “आपल्या प्रतिरूपाचा” असं बनवलं आहे आणि त्याच्यात देवासारखे सुंदर गुण प्रदर्शित आणि विकसित करण्याची क्षमता आहे.​—उत्पत्ति १:२६, २७.

“हे परमेश्‍वरा, तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस. . . तू दुरून माझे मनोगत समजतोस. . . मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.”​स्तोत्र १३९:१, २, २३.

विचार करा: देव तुम्हाला व्यक्‍तिगत रीत्या ओळखतो. तो तुमच्या मनातली भावना आणि चिंता जाणतो. इतर जण कदाचित तुमच्या समस्या आणि चिंता समजू शकत नाहीत पण यहोवा त्या जाणतो. त्याला तुमची काळजी आहे आणि तुम्हाला मदत करण्याचीही त्याची इच्छा आहे. यामुळे तुमच्या जीवनाला अर्थ आहे.

तुमचं जीवन अर्थपूर्ण आहे

“हे परमेश्‍वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचो. . . . तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. . . . त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे.”​स्तोत्र १०२:१, २, १७.

विचार करा: मानवांना जेव्हापासून दुःख भोगावं लागलं आहे तेव्हापासून त्यांनी गाळलेले सर्व अश्रू जणू यहोवा देवाच्या लक्षात आहेत. (स्तोत्र ५६:८) यांमध्ये तुमच्या अश्रूंचाही समावेश होतो. तुम्ही त्याच्यासाठी मौल्यवान असल्यामुळे तुम्हाला झालेला त्रास आणि तुमचे अश्रू तो कधीच विसरणार नाही.

“तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो . . . मी परमेश्‍वर तुझा देव . . . म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो.”​यशया ४१:१०, १३.

विचार करा: देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. आपण अडखळून पडलो तरी तो आपल्याला पुन्हा उभं राहायला हात देतो.

उज्ज्वल भविष्याची आशा

“देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”​योहान ३:१६.

विचार करा: देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, येशूला तुमच्यासाठी अर्पण केलं आहे. यामुळे तुम्हाला सर्वकाळासाठी असलेलं आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची एक आशा मिळाली आहे. *

तुमच्या जीवनात दुःख असेल आणि ते सहन करणं तुम्हाला खूप कठीण जात असेल. अशा वेळी तुम्ही देवाच्या वचनांचा अभ्यास करू शकता आणि त्याने अभिवचन दिलेल्या आशेवर आपला भरवसा बळकट करू शकता. असं केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला खात्री पटेल की जीवन नक्कीच अर्थपूर्ण आहे!

^ येशूच्या बलिदानाद्वारे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी www.mt711.com/mr या वेबसाईटवर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ आमच्याविषयी > स्मारकविधी इथे पाहा.