व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बिस्किटांमुळे मिळालं सत्य!

बिस्किटांमुळे मिळालं सत्य!

अमेरिकेच्या ओरेगन राज्यात राहणारे निक सांगतात: “२०१४ सालची गोष्टय. वसंत ऋतुच्या त्या छान वातावरणात मी माझ्या दोन कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी बाहेर पडलो होतो. फिरत असताना एक गोष्ट मी नेहमी पाहायचो. शहराच्या मध्यवर्ती भागात यहोवाचे साक्षीदार सहसा आपली साहित्याची ट्रॉली घेऊन उभे असायचे. छान कपड्यांत असलेले हे लोक येणा-जाणाऱ्‍यांचं हसऱ्‍या चेहऱ्‍यानं स्वागत करत थांबलेले असायचे.

विशेष म्हणजे ते फक्‍त लोकांसोबतच नाही, तर माझ्या कुत्र्यांसोबतही खूप प्रेमाने वागायचे. एकदा, त्यांच्यापैकीच एक असलेली ईलेन ट्रॉलीजवळ उभी होती. तिने माझ्या दोन कुत्र्यांना काही बिस्किटं दिली. पण झालं असं की त्यानंतर बिस्किटं मिळतील म्हणून माझी कुत्री मला नेहमीच तिच्या ट्रॉलीकडे ओढून नेऊ लागली.

हे असं बरेच महिने चालत राहिलं. माझी कुत्री बिस्किटांची मजा घेत राहायची आणि मी त्यांच्यासोबत थोडक्यात बोलून निघून जायचो. मलाही ते छान वाटायचं. त्या वेळी मी सत्तर एक वर्षांचा होतो. पण त्यांच्याशी जास्त ओळख करून घ्यायला मी जरा कचरायचोच. ते नेमकं काय मानतात हे मला माहीत नव्हतं. आणि ते जाणून घ्यावं असंही वाटत नव्हतं. कारण चर्चच्या शिकवणी मला पटत नव्हत्या. आणि त्यामुळे बायबलचा स्वतःच अभ्यास केलेला बरा, असं मला वाटायचं.

या काळात मी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॉली घेऊन उभ्या असलेल्या साक्षीदारांना पाहायचो. तेसुद्धा सगळ्यांशी खूप प्रेमाने वागायचे. मी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं ते नेहमी बायबलमधून द्यायचे. आणि त्यामुळेच माझा त्यांच्यावरचा विश्‍वास वाढत गेला.

एकदा ईलेनने मला विचारलं, ‘प्राणी देवाकडून आपल्याला मिळालेली एक भेट आहे, असं तुम्हाला वाटतं का?’ ‘हो मग! नक्कीच,’ मी उत्तर दिलं. मग तिने मला यशया ११:६-९ हे वचन दाखवलं. तेव्हापासून मला बायबलबद्दल जास्त जाणून घ्यावसं वाटू लागलं. पण साक्षीदारांकडून कोणतंही साहित्य घ्यायला मी अजूनही तयार नव्हतो.

पुढे काही दिवस ईलेन आणि तिच्या पतीसोबत म्हणजे ब्रेन्टसोबत थोडक्यात पण चांगल्या चर्चा झाल्या. ख्रिस्तासारखं व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे जाणून घेण्यासाठी मी मत्तयपासून प्रेषितांची कार्यं पर्यंत वाचून काढावं असं त्यांनी मला सुचवलं. आणि मी तसंच केलं. त्यानंतर काही दिवसांमध्येच मी त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करू लागलो. मला आठवतंय, ते २०१६ सालच्या उन्हाळ्यातले दिवस होते.

त्यानंतर मला दर आठवडी बायबल अभ्यासाची आणि मिटींगला जायची गोडी लागली. बायबल नेमकं काय शिकवतंय हे जाणून घेणं मला एका आशीर्वादासारखंच वाटायचं आणि त्यातून मला खूप आनंद मिळायचा. मग साधारण एक वर्षाने मी बाप्तिस्मा घेतला. आज माझं वय ७९ आहे. मला माहीतीए की मी योग्य मार्ग निवडलाय. यहोवाने मला त्याच्या जागतिक कुटुंबाचा एक भाग बनवून खरंच खूप आशीर्वादित केलंय!”