व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एरीक आणि एमी

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात

राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या देशात जाऊन सेवाकार्य करणाऱ्या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला तुम्ही ओळखता का? अशा साक्षीदारांना ‘नीड ग्रेटर्स’ म्हणजे, जिथे जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करणारे म्हणून ओळखलं जातं. तुम्ही कधी पुढील गोष्टींवर विचार केला आहे का: ‘दुसऱ्या देशात जाऊन सेवाकार्य करण्यासाठी हे बंधुभगिनी कोणत्या गोष्टीमुळे प्रोत्साहित होतात? अशा प्रकारच्या सेवाकार्यासाठी ते कोणती तयारी करतात? त्यांच्याप्रमाणेच मलाही अशा प्रकारच्या सेवाकार्यात कधी भाग घेता येईल का?’ ज्यांनी अशा प्रकारच्या सेवाकार्याचा अनुभव घेतला आहे, तेच या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊ शकतील. चला तर मग, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.

ते कोणत्या गोष्टीमुळे प्रोत्साहित झाले?

जास्त गरज असलेल्या देशात जाऊन सेवाकार्य करण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला? पस्तीसच्या आसपास वय असलेली व मूळची अमेरिकेची आपली एक बहीण एमी म्हणते: “बऱ्याच वर्षांपासून, मी दुसऱ्या देशात जाऊन सेवाकार्य करण्याचा विचार करत होते, पण हे ध्येय मला माझ्या आवाक्याबाहेरचं वाटत होतं.” मग तिचा हा दृष्टिकोन कोणत्या गोष्टीमुळे बदलला? “२००४ मध्ये बेलीझ या देशात सेवा करणाऱ्या एका जोडप्यानं, मला त्यांच्यासोबत एक महिना पायनियरिंग करण्यासाठी बोलावलं. जेव्हा मी तिथं गेले तेव्हा मला ते खूप आवडलं! आणि मग एका वर्षानं मी घानामध्ये पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी गेले.”

एरन आणि स्टेफनी

काही वर्षांआधी, अमेरीकेतलीच आणखी एक बहीण स्टेफनी, जिचं वय आता पंचवीस पेक्षा जास्त आहे, तिनेदेखील स्वतःच्या परिस्थितीचं बारकाईने परीक्षण केलं आणि विचार केला: ‘माझं आरोग्य चांगलं आहे आणि माझ्यावर कुटुंबाची कोणती जबाबदारीही नाही. खरंतर, मी यहोवाची आता जितकी सेवा करते त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात करू शकते.’ तिने केलेल्या या प्रामाणिक आत्मपरीक्षणानं, तिला घाना या देशात जाऊन सेवाकार्य वाढवण्याचं प्रोत्साहन दिलं. वयाच्या चाळिशीत असलेले फिलिप ईडा हे मूळचे डेन्मार्कचे आहेत. या पायनियर जोडप्याचंही नेहमी एक स्वप्न होतं, राज्य प्रचारकांची जिथं जास्त गरज आहे अशा क्षेत्रात जाऊन सेवा करणं. त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे बरेच मार्ग शोधले. फिलिप म्हणतो, “आणि जेव्हा तशी संधी आली, तेव्हा जणू काही यहोवा आम्हाला सांगत होता: ‘ही संधी स्वीकारा.’” २००८ साली ते घानामध्ये गेले आणि तिथं त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा केली.

ब्रूक आणि हान्स

हान्स आणि ब्रूक हे वयाच्या तिशीत असलेलं पायनियर जोडपं, सध्या अमेरिकेत सेवाकार्य करत आहे. २००५ मध्ये झालेल्या कटरिना चक्रीवादळानंतर, बांधवांच्या सेवेसाठी त्यांनी संस्थेच्या आपत्कालीन बचावकार्यात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रकल्पांत सहभागी होण्यासाठी संस्थेकडे अर्ज पाठवला. परंतु त्यांना या कामासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही. याविषयीच्या आठवणींना उजाळा देताना हान्स म्हणतो: “अधिवेशनातील एका भाषणात आम्ही राजा दाविदाविषयी ऐकलं. त्याला मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा असतानाही, या कामासाठी त्याला निवडलं गेलं नाही. त्यानेदेखील ही गोष्ट स्वीकारली आणि स्वतःचं ध्येय बदललं. या भाषणानं आम्हाला एक गोष्ट समजण्यास मदत केली, ती म्हणजे आपली आध्यात्मिक ध्येय बदलणं यात काहीही गैर नाही.” (१ इति. १७:१-४, ११, १२; २२:५-११) याविषयी ब्रूक म्हणते, “आम्ही सेवेचा दुसरा दरवाजा ठोठवावा अशी यहोवाची इच्छा होती.”

दुसऱ्या देशात सेवाकार्य केलेल्या आपल्या मित्रांकडून हान्स आणि ब्रूकने अनेक रोमांचक अनुभव ऐकले. तेव्हा परदेशात जाऊन पायनियरिंग करण्याचं उत्तेजन त्यांना मिळालं. २०१२ मध्ये ते घाना देशात चार महिन्यांकरता सेवाकार्यासाठी जाऊ शकले. तिथं त्यांनी साईन-लॅग्वेज (संकेत भाषा) मंडळीत सेवा केली. चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा अमेरिकेत परत यावं लागलं. पण घानामधील सेवाकार्यात आलेल्या अनुभवांमुळे, राज्याच्या कार्याला जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याची त्यांची इच्छा आणखी दृढ झाली. त्यानंतर त्यांनी माइक्रोनीशिया या देशात शाखा कार्यालयाच्या बांधकाम प्रकल्पामध्ये मदत केली.

ध्येय गाठण्यास त्यांनी पावलं उचलली

गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवाकार्य करण्यासाठी तुम्ही कोणती तयारी केली? स्टेफनी म्हणते: “गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवाकार्य करण्याविषयी टेहळणी बुरूजमध्ये जे लेख होते त्यांवर मी संशोधन केलं.” * पुढे ती म्हणते, “तसंच दुसऱ्या देशात सेवा करण्याच्या माझ्या इच्छेविषयी मी मंडळीतील वडिलांसोबत व सर्किट ओवरसियर आणि त्यांच्या पत्नीसोबत बोलले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ध्येयाविषयी मी प्रार्थनेत यहोवाला सांगत राहिले.” यासोबतच स्टेफनीने तिचं जीवनमान साधं ठेवलं, त्यामुळे दुसऱ्या देशात स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिला काही पैसे साठवता आले.

हान्स सांगतो: “मार्गदर्शनासाठी आम्ही यहोवाकडे प्रार्थना केली, कारण जिथं आम्हाला घेऊन जाण्याची त्याची इच्छा होती, तिथं आम्हाला जायचं होतं. तसंच जाण्याची आम्ही जी तारीख निश्‍चित केली होती, तीदेखील आम्ही प्रार्थनेत त्याला सांगत होतो.” या जोडप्याने चार वेगवेगळ्या शाखा कार्यालयांना पत्रं पाठवली. त्यांना जेव्हा घाना शाखा कार्यालयातून सकारात्मक उत्तर मिळालं, तेव्हा दोन महिने तिथं राहण्याच्या उद्देशानं ते गेले. हान्स पुढे म्हणतो “आम्ही तिथल्या मंडळीसोबत सेवाकार्याचा इतका आनंद घेतला, की आणखी काही महिने तिथंच राहण्याचा आम्ही निश्चय केला.”

अॅड्रिया आणि जॉर्ज

पस्तीस पेक्षा जास्त वय असलेले जॉर्ज आणि अॅड्रिया हे मूळचे कॅनडाचे. या जोडप्यानं नेहमी एक गोष्ट मनात ठेवली, ती म्हणजे यहोवा चांगल्या हेतूंवर नाही, तर घेतलेल्या चांगल्या निर्णयांवर आशीर्वाद देतो. म्हणून त्यांनी त्यांचं ध्येय गाठण्यासाठी निर्णयात्मक पावलं उचलली. घानामधील राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणाऱ्या एका बहिणीशी त्यांनी संपर्क साधला, आणि बरेच प्रश्न विचारले. त्यांनी कॅनडा आणि घाना शाखा कार्यालयांनाही पत्रं पाठवली. अॅड्रिया म्हणते: “आमचं जीवनमान साधंच होतं, पण आता आम्ही ते आणखी साधं करण्याचे मार्ग शोधू लागलो.” त्यांनी उचललेल्या या निर्णयात्मक पावलांमुळे २००४ मध्ये ते घाना या देशात सेवाकार्यासाठी जाऊ शकले.

आव्हानांचा कशा प्रकारे सामना केला?

घानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? आणि त्यांचा सामना तुम्ही कशा प्रकारे केला? एमी समोर आलेल्या सुरुवातीच्या काही आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे, तिला घरची खूप आठवण यायची. घरातील सदस्यांची कमी तिला जाणवायची. एमी म्हणते: “मला माहीत असलेल्या गोष्टींपेक्षा हे सगळं अगदीच वेगळं होतं.” मग तिला कोणत्या गोष्टींमुळे मदत मिळाली? “माझ्या कुटुंबातील सदस्य मला नेहमी फोन करून सांगायचे, की मी घेतलेल्या निर्णयाची ते फार कदर करतात. त्यामुळे मला माझं सेवाकार्य सुरू ठेवण्यासाठी मदत झाली. त्यानंतर माझ्या कुटुंबासोबत मी व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. आता आम्ही एकमेकांना पाहू शकत असल्यामुळे मला ते माझ्यापासून दूर वाटत नव्हते.” एमी पुढे सांगते, की एका स्थानिक व अनुभवी बहिणीसोबत तिनं मैत्री केली, आणि याचा तिला खूप फायदा झाला. त्या बहिणीनं तिला तिथली संस्कृती समजून घेण्यास खूप मदत केली. “जेव्हा-केव्हा मला एखादी गोष्ट कळत नव्हती किंवा लोक एखाद्या परिस्थितीत अशा प्रकारे का वागले हे समजत नव्हतं, तेव्हा माझी ही मैत्रीण माझ्यासाठी फार मोलाची मदत ठरली. कोणत्या परिस्थितीत काय करावं आणि काय करू नये हे तिच्यामुळे मला शिकायला मिळालं. आणि हे सर्व मला माझी सेवा आनंदानं करण्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं.”

जॉर्ज आणि अॅड्रिया त्यांच्या अनुभवाविषयी सांगतात की, घानामध्ये जाणं हे जणू काही त्यांच्यासाठी जुन्या काळात गेल्यासारखं होतं. अॅड्रिया म्हणते, “कपडे धुण्यासाठी आम्ही वॉशिंग-मशीन ऐवजी, आता बादलीचा वापर करत होतो. आणि असं वाटत होतं जणू जेवण बनवण्यासाठी आता आम्हाला पूर्वीपेक्षा दहा पट जास्त वेळ खर्च करावा लागत आहे.” ती पुढे म्हणते, “पण काही काळानंतर या कठीण वाटणाऱ्या गोष्टी एक नवीन व चांगला अनुभव ठरल्या.” याविषयी बोलताना ब्रूक म्हणते: “आम्हा पायनियरांना अनेक समस्यांना व आव्हानांना तोंड द्यावं लागतं, पण असं असलं तरीही आम्ही एक समाधानी जीवन जगतो. सेवाकार्यातील सर्व अनुभव आमच्यासाठी जणू फुलांच्या एका सुंदर गुच्छासारखे आहेत. त्या आठवणी आमच्यासाठी एक मौल्यवान साठा आहेत.”

सेवाकार्यातील चांगली फळं

अशा प्रकारचं सेवाकार्य करण्याचं तुम्ही इतरांना उत्तेजन द्याल का? आणि का? स्टेफनी म्हणते: “जिथं लोकांना सत्य शिकण्याची तीव्र इच्छा आहे, आणि तुमच्यासोबत त्यांना दररोज बायबलचा अभ्यास करायचा आहे, अशा क्षेत्रामध्ये जाऊन सेवाकार्य करणं खरंच खूप आनंद आणि समाधान देणारं आहे.” पुढे ती सांगते, “राज्य प्रचारकांची जिथं जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा माझा निर्णय, हा आतापर्यंत मी घेतलेल्या निर्णयांमधला एक उत्तम निर्णय ठरला आहे.” २०१४ मध्ये स्टेफनीने एरन सोबत लग्न केलं, आणि आज ती दोघं घाना शाखा कार्यालयात पूर्णवेळेची सेवा करत आहेत.

मूळची जर्मनी या देशाची क्रिस्टीन म्हणते, “हा खरोखरच फार चांगला अनुभव आहे.” क्रिस्टीन या बहिणीचं वय तीस-पस्तीसच्या आसपास असून ती एक पायनियर आहे. घानामध्ये सेवाकार्यासाठी जाण्याआधी ती बोलिव्हिया या देशात सेवाकार्य करत होती. आपल्या अनुभवाविषयी ती सांगते: “कुटुंबापासून दूर असल्यामुळे मी मदतीसाठी नेहमी यहोवाकडे वळते. यामुळे यहोवासोबतचं माझं नातं आणखी जवळचं झालं आहे. आणि त्याच्या लोकांमध्ये असलेली एकता मी जवळून अनुभवली आहे. अशा प्रकारच्या सेवेनं माझ्या जीवनाला एक नवं वळण दिलं.” काही काळाआधीच क्रिस्टीनचं लग्न गिडीअनशी झालं, आणि ते आजही घानामध्ये सेवा करत आहेत.

क्रिस्टीन आणि गिडीअन

आपल्या बायबल विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी फिलिप व ईडानी मदत कशी केली, याविषयी ते सांगतात: “आमच्याकडे १५ किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त बायबल अभ्यास होते. पण आम्ही स्वतःहून ते कमी केले आणि १० पेक्षा जास्त बायबल अभ्यास आम्ही घेत नव्हतो. कारण मग यामुळे आम्हाला बायबल विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना बायबलचं सत्य खोलवर शिकवणं शक्य झालं.” यामुळे विद्यार्थ्यांना काही फायदा झाला का? आपल्या एका अनुभवाविषयी फिलिप सांगतो: “मायकल नावाच्या एका तरुणासोबत मी रोज बायबल अभ्यास करायचो. तो फार चांगला विद्यार्थी होता, नेहमी अभ्यासाची पूर्वतयारी करायचा. आणि त्यामुळे बायबल काय शिकवते हे पुस्तक आम्ही एका महिन्यातच संपवलं. त्यानंतर मायकल बाप्तिस्मारहित प्रचारक बनला. त्याच्या प्रचारकार्याच्या पहिल्या दिवशीच तो मला म्हणाला: ‘तुम्ही मला माझ्या बायबल विद्यार्थ्यांना शिकवायला मदत कराल का?’ मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो. मायकलने मला सांगितलं की, त्याने तीन बायबल अभ्यास सुरू केले होते आणि त्यांचा अभ्यास घेण्यासाठी त्याला माझी मदत हवी होती.” इथं बायबल विद्यार्थ्यांनाच इतरांना बायबल शिकवावं लागत आहे. यावरूनच आपण कल्पना करू शकतो की, घानामध्ये प्रचारकांची खरंच किती जास्त गरज आहे.

ईडा आणि फिलिप

राज्य प्रचारकांची किती गरज आहे हे घानामध्ये गेल्यानंतर एमीला लगेचच जाणवलं. ती म्हणते: “घानामध्ये आल्यानंतर काही दिवसांनी लगेचच आम्ही एका लहानशा खेड्यात प्रचारकार्यासाठी गेलो. तिथं आम्ही अशा लोकांचा शोध करू लागलो ज्यांना ऐकता व बोलता येत नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला एक नाही तर तब्बल आठ तसे लोक मिळाले!” कालांतराने एमीचं लग्न एरीक सोबत झालं, आणि ती दोघं आता खास पायनियर म्हणून साईन-लॅग्वेज (संकेत भाषा) मंडळीमध्ये सेवा करत आहेत. त्या देशात जवळजवळ ३०० पेक्षा अधिक, ऐकता व बोलता न येणारे प्रचारक आणि आस्थेवाइक लोक आहेत, आणि त्यातील काही जणांना ते मदत करत आहेत. घानामध्ये जाऊन सेवाकार्य केल्यानं, जॉर्ज आणि अॅड्रिया यांना मिशनरी सेवा काय असते हे अनुभवायला मिळालं. त्यामुळे संघटनेकडून जेव्हा त्यांना १२६ व्या गिलियड प्रशालेसाठी निमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्यांना खरंच किती आनंद झाला असेल! आज ती दोघं मोझंबिकमध्ये मिशनरी म्हणून सेवा करत आहेत.

खऱ्या प्रेमानं त्यांना प्रोत्साहित केलं

कापणीच्या कामात स्थानिक मंडळीतील बांधवांच्या खांद्याला खांदा लावून, इतर देशातील बंधुभगिनीदेखील मेहनतीनं काम करत आहेत. हे खरंच खूप हृदयस्पर्शी आहे! (योहा. ४:३५) घानामध्ये प्रत्येक आठवडी अंदाजे १२० जण बाप्तिस्मा घेतात. घानामधील १७ ‘नीड ग्रेटर्स,’ म्हणजे जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्यांप्रमाणेच, जगभरातील हजारो सुवार्तिक यहोवावर असलेल्या प्रेमामुळे प्रेरित होऊन सेवा करण्यासाठी ‘स्वेच्छेनं पुढे आले’ आहेत. आणि राज्य प्रचारकांची जिथं जास्त गरज आहे अशा ठिकाणी ते सेवा करत आहेत. अशा प्रकारचं सेवाकार्य करणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना पाहून, यहोवाचं मन खरोखरच आनंदी होत नसेल का?—स्तो. ११०:३; नीति. २७:११.