व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

सर्वांना सर्वकाही झालो

सर्वांना सर्वकाही झालो

“जर तू बाप्तिस्मा घेतलास, तर मी तुला सोडून जाईन!” ही धमकी माझ्या बाबांनी माझ्या आईला दिली. पण, तरीही माझ्या आईने बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या बाबांनीही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. ते आम्हाला सोडून गेले. ही घटना आहे १९४१ सालातील. त्या वेळी मी फक्त आठ वर्षांचा होतो.

ही घटना घडली त्याच्या आधीपासूनच सत्यात मला आस्था वाटू लागली होती. तेव्हा माझ्या आईला काही बायबल प्रकाशनं मिळाली होती आणि ती मला खूप आवडायची; खासकरून त्यातील चित्रं. माझी आई जे शिकत होती ते तिने मला शिकवू नये अशी माझ्या बाबांची इच्छा होती. पण, ती शिकत असलेल्या गोष्टी जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती आणि मी तिला प्रश्नही विचारायचो. म्हणून मग बाबा घरात नसताना आई माझ्यासोबत अभ्यास करायची. याचा परिणाम म्हणजे मीही यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यास प्रेरित झालो. मग, १९४३ साली दहा वर्षांचा असताना मी इंग्लंडमधील, ब्लॅकपूल या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला.

मी यहोवाची सेवा करू लागलो

तेव्हापासूनच मी माझ्या आईसोबत नियमित रीत्या सेवाकार्यात जाऊ लागलो. त्या वेळी आम्ही प्रचारकार्य करण्यासाठी फोनोग्राफचा वापर करायचो. फोनोग्राफ खूप मोठा असायचा आणि त्याचं वजन जवळजवळ साडे चार किलो होतं. माझ्यासारख्या लहान मुलाला इतका मोठा आणि जड फोनोग्राफ घेऊन जायला खूप कठीण जायचं.

१४ वर्षांचा होण्याआधीच मी हे ठरवलं होतं की, पुढे जाऊन मी पायनियर सेवा सुरू करेल. पण, त्याआधी मी बांधवांचे सेवक (आता यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून ओळखलं जातं) यांच्याशी बोलावं असं माझ्या आईने मला सुचवलं. मी त्या बांधवाशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मी आधी असं एखादं कौशल्य शिकून घ्यावं ज्यामुळे मला माझा स्वतःचा खर्च भागवता येईल आणि पायनियरिंग करता येईल. मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच केलं. मग दोन वर्षं काम केल्यानंतर मी दुसऱ्या एका विभागीय पर्यवेक्षकाला पायनियर सेवा करण्याच्या माझ्या इच्छेबद्दल सांगितलं. ते मला म्हणाले, “हो, नक्की सुरू कर!”

मग १९४९ सालाच्या एप्रिल महिन्यात माझ्या आईने आणि मी घरातील सर्व फर्निचर देऊन टाकलं आणि मँचेस्टरच्या जवळ असलेल्या मिडलटन या ठिकाणी राहायला गेलो. तिथं आम्ही पायनियर सेवा सुरू केली. चार महिन्यांनंतर मी एका बांधवाला माझा पायनियर सोबती म्हणून निवडलं. शाखा कार्यालयाने आम्हाला आरलाम या ठिकाणी नवीनच तयार झालेल्या एका मंडळीत सेवा करण्यासाठी सुचवलं. माझी आई दुसऱ्या एका मंडळीत एका बहिणीसोबत पायनियरिंग करू लागली.

तेव्हा मी फक्त १७ वर्षांचा होतो. पण, तरी माझ्यावर आणि माझ्या पायनियर सोबत्यावर मंडळीच्या सभा चालवण्याची जबाबदारी आली. कारण, नवीनच तयार करण्यात आलेल्या त्या मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पात्रता असलेल्या बांधवांची संख्या खूप कमी होती. काही काळानंतर, मी बक्सटन इथल्या मंडळीत सेवा करण्यासाठी गेलो. कारण, तिथं खूप कमी प्रचारक असल्यामुळे त्यांना मदतीची गरज होती. माझ्या या सर्व अनुभवांमुळे मी पुढच्या नेमणुकांसाठी तयार होत गेलो.

१९५३ साली न्यूयॉर्कच्या रॉचेस्टर या ठिकाणी इतरांसोबत मिळून जाहीर भाषणाची जाहिरात करताना

१९५१ साली मी गिलियड प्रशालेसाठी अर्ज भरला. पण, १९५२ च्या डिसेंबर महिन्यात मला लष्करात भरती होण्यासाठी बोलावण्यात आलं. मी पूर्णवेळेचा सेवक आहे हे कारण देत मला लष्करातून सूट मिळावी अशी विनंती मी त्यांना केली. पण, कोर्टाने माझी विनंती मान्य केली नाही आणि सहा महिन्यांसाठी मला तुरुंगात टाकण्यात आलं. तिथं असतानाच मला गिलियड प्रशालेच्या २२ व्या वर्गात उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. त्यामुळे मग तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही काळातच, म्हणजे जुलै १९५३ साली मी जॉर्जिक नावाच्या जहाजाने न्यूयॉर्कला जायला निघालो.

तिथं पोचल्यावर, लगेचच मी १९५३ साली झालेल्या न्यू वर्ल्ड सोसायटी असेंब्लीत उपस्थित राहिलो. मग त्यानंतर मी न्यूयॉर्कमधील साऊथ लॅन्सींग इथं गेलो. त्या ठिकाणी आमची गिलियड प्रशाला होणार होती. तुरुंगातून नुकतीच सुटका झाल्यामुळे माझ्याजवळ खूप कमी पैसे होते. ट्रेनमधून उतरल्यानंतर साऊथ लॅन्सींगला जाणाऱ्या बसचं तिकिट काढण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसेही नव्हते. म्हणून मग मला दुसऱ्या एका प्रवाशाकडून २५ सेंट इतके पैसे उसणे घ्यावे लागले.

परदेशातील सेवेसाठी नेमणूक

गिलियड प्रशालेत मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे “सर्वांना सर्व काही” होण्यास आम्हाला चांगली मदत झाली. (१ करिंथ. ९:२२) माझ्यासोबत आणखी दोन जणांना, म्हणजे पॉल ब्रुन व रेमन्ड लेच यांना फिलिपीन्झ या देशात सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. पण, आमचे व्हिजा मिळेपर्यंत आम्हाला काही महिन्यांसाठी न्यूयॉर्कमध्येच थांबावं लागलं. त्यानंतर आम्ही जहाजाने नेदरलँड्‌सच्या रॉटरडॅम या ठिकाणी गेलो. मग पुन्हा जहाजानेच भूमध्य समुद्रातून पुढे सुवेझ कालवा, हिंदी महासागर ते मलेशिया आणि मग हाँगकाँग असा आमचा प्रवास झाला. शेवटी ४७ दिवसांचा हा समुद्रप्रवास करून आम्ही १९ नोव्हेंबर १९५४ ला फिलिपीन्झची राजधानी मनिला इथं पोहचलो.

फिलिपीन्झमधील आमची मिशनरी नेमणूक स्वीकारण्यासाठी, मी आणि रेमन्ड लेच यांनी ४७ दिवस जहाजाने प्रवास केला

नवीन देश, नवीन संस्कृती आणि नवीन भाषा या सर्व गोष्टींशी आम्हाला तिथं जुळवून घ्यावं लागलं. सुरवातीला आम्हाला केझॉन शहरातल्या मंडळीत नेमण्यात आलं. तिथं बहुतेक लोकांना इंग्लिश येत असल्यामुळे आम्हाला थोडं सोपं गेलं. पण, यामुळे सहा महिन्यांनंतरही आम्हाला तगालोग भाषेचे फक्त थोडेफारच शब्द येऊ लागले. आमच्या पुढच्या नेमणुकीमुळे मात्र आम्हाला ही भाषा चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत झाली.

१९५५ साली मे महिन्यात आम्हाला एक नवीन नेमणूक देण्यात आली. एक दिवस जेव्हा आम्ही प्रचार करून घरी परत आलो, तेव्हा बंधू लेच आणि माझ्यासाठी काही पत्रं आली होती. त्या पत्रांत आमच्या या नवीन नेमणुकीबद्दल सांगण्यात आलं होतं. आम्हाला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. त्या वेळी मी फक्त २२ वर्षांचा होतो. पण या नवीन नेमणुकीमुळे मला “सर्वांना सर्व काही” होण्याचे आणखी काही नवीन मार्ग शिकायला मिळाले.

बाय-कोल भाषेतील विभागीय संमेलनात जाहीर भाषण देताना

उदाहरणार्थ, विभागीय पर्यवेक्षक या नात्याने मी माझं पहिलं भाषण गावातील एका दुकानाबाहेर दिलं. त्या वेळी फिलिपीन्झमध्ये जाहीर भाषणं ही खरोखरच जाहीर रीत्या सार्वजनिक ठिकाणीच दिली जायची! विभागातील वेगवेगळ्या मंडळ्यांना भेट देत असतानाही मला सार्वजनिक ठिकाणीच जाहीर भाषणं द्यावी लागायची. जसं की, सार्वजनिक गझीबो, (लोकांना बसण्यासाठी बागेत किंवा इतर ठिकाणी उभारलेले लहान मनोरे) बाजार, सार्वजनिक सभागृहांबाहेर, बासकेट बॉल कोर्टवर, बगीच्यांमध्ये आणि बहुतेक वेळा रस्त्यांवर. एकदा सॅन पाबलो या शहरात असताना जोरदार पावसामुळे बाजारात जाऊन जाहीर भाषण देणं मला शक्य होणार नव्हतं. त्यामुळे भाषण राज्य सभागृहातच द्यावं असं मी मंडळीतील जबाबदार बांधवांना सुचवलं. मग सभा झाल्यानंतर बांधवांनी मला विचारलं की या सभेला जाहीर सभा म्हणणं योग्य राहील का? कारण ती जाहीर रीत्या सार्वजनिक ठिकाणी घेण्यात आली नव्हती!

मी नेहमी बांधवांच्या घरी राहायचो. घरं खूप साधी असली तरी ती स्वच्छ व नीटनेटकी असायची. बहुतेक वेळा झोपण्यासाठी फक्त एक चटई असायची. अंघोळ करण्यासाठी बाथरूम नव्हते. त्यामुळे मग घराबाहेर उघड्यावरच आंघोळ करावी लागायची. हे माझ्यासाठी कठीण होतं, पण मी त्याची सवय करून घेतली. मी सहसा बसने आणि कधीकधी दुसऱ्या बेटांवर जाण्यासाठी बोटीनं प्रवास करायचो. सेवेत घालवलेल्या सर्व वर्षांमध्ये मी कधीही स्वतःची कार विकत घेतली नाही.

तगालोग भाषा शिकण्यासाठी मी कोणताही क्लास लावला नव्हता. पण तरीही मी ती भाषा चांगल्या प्रकारे शिकलो. याचं कारण म्हणजे, बांधव प्रचारकार्यात आणि सभांमध्ये कसे बोलतात हे मी खूप लक्षपूर्वक ऐकायचो. शिवाय, मला ही भाषा शिकवण्यासाठी बांधवांनीही फार मदत केली. भाषा शिकत असताना त्यांनी धीर दाखवला आणि प्रामाणिकपणे माझ्या चुका सुधारल्या. यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे.

काळासोबत मला आणखी बरेच बदल करावे लागले. कारण मला आणखी काही नवीन नेमणुका देण्यात आल्या. १९५६ साली जेव्हा बंधू नेथन नॉर आले, तेव्हा तिथं एक राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं. त्या अधिवेशनात मला पत्रकारांसोबत संवाद साधण्याची व त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी मी हे काम कधीच केलं नव्हतं. पण, इतरांनी मला हे शिकण्यास बरीच मदत केली. त्यानंतर एका वर्षाच्या आत पुन्हा एकदा राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं. या वेळी मी अधिवेशनाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्या वेळी जागतिक मुख्यालयातून बंधू फ्रेडरीक फ्रान्झ यांनी आम्हाला भेट दिली, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. जेव्हा त्यांनी जाहीर भाषण दिलं तेव्हा त्यांनी फिलिपीन्झचा पारंपरिक पोषाख बारोंग तगालोग घातला होता. यामुळे तिथले बांधव खूप खूश झाले आणि मीही एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे स्थानिक परिस्थितींनुसार बदल करण्यास आपणही तयार असलं पाहिजे.

पुढे जेव्हा मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं, तेव्हाही मला आणखी बऱ्याच गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं. त्या वेळी आम्ही सहसा सार्वजनिक ठिकाणी प्रोजेक्टरवर द हॅपिनेस ऑफ द न्यू वर्ल्ड सोसायटी नावाची फिल्म दाखवायचो. फिल्म चालू असताना प्रोजेक्टरच्या लाईटमुळे कधीकधी लहानलहान किडे जमा व्हायचे आणि त्यामुळे भरपूर त्रास व्हायचा. ते प्रोजेक्टरमध्ये अडकून जायचे आणि मग नंतर आम्हाला खूप मेहनत घेऊन प्रोजेक्टर साफ करत बसावा लागायचा. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आयोजित करणं सोपं नव्हतं. पण, जेव्हा लोक जमा व्हायचे आणि यहोवाच्या जगव्याप्त संघटनेबद्दल शिकायचे, तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटायचं.

संमेलन आयोजित करण्यासाठी आम्हाला अनुमती मिळू नये म्हणून काही ठिकाणी कॅथलिक पाळक अधिकाऱ्यांवर दबाव आणायचे. शिवाय, जेव्हा चर्चच्या जवळपास भाषणं दिली जायची तेव्हा लोकांना ऐकू येऊ नये म्हणून ते जाणूनबुजून चर्चची मोठी घंटा वाजवायचे. पण, हे सगळं होऊनही तिथले लोक सत्य शिकत राहिले आणि आज तिथले बरेच लोक यहोवाचे उपासक बनले आहेत.

नवीन नेमणूका आणि आणखी काही बदल

१९५९ साली मला शाखा कार्यालयात सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं. तिथं मला जे अनुभव आले त्यातून मी बरंच काही शिकलो. काही काळानंतर मला झोन ओव्हर्सियर या नात्यानं इतर देशांना भेटी देण्यासाठी सांगण्यात आलं. त्यादरम्यान थायलंडमध्ये मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्या जॅनेट डुमंड या बहिणीशी माझी ओळख झाली. काही काळासाठी आम्ही एकमेकांना पत्रं लिहिली आणि नंतर आम्ही लग्न केलं. आता गेल्या ५१ वर्षांपासून आम्ही सोबत मिळून आनंदाने यहोवाची सेवा करत आहोत.

जेनेटसोबत फिलिपीन्झमधील एका बेटावर

मी ३३ देशांना भेटी दिल्या आहेत. वेगवेगळ्या देशांतील यहोवाच्या सेवकांना भेटण्यात मला भरपूर आनंद मिळाला. माझ्या सुरवातीच्या नेमणुकांमुळे वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि पार्श्वभूमीच्या लोकांसोबत कसा व्यवहार करावा हे मला शिकायला मिळालं. त्यामुळे मला खूप फायदा झाला. वेगवेगळ्या देशांना दिलेल्या भेटींमुळे मला हे समजण्यास मदत झाली की, यहोवा हा सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करतो.—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

आम्ही नियमित रीत्या सेवाकार्यात सहभाग घेतो

आम्ही आजही बदलांशी जुळवून घेत आहोत

फिलिपीन्झमधील बांधवांसोबत सेवा करताना मला आणि जॅनेटला खूप आनंद व समाधान मिळालं. आजही आम्ही केझॉन शहरातील शाखा कार्यालयात सेवा करत आहोत. या शहरात मी ६० वर्षांआधी सेवा करण्यास सुरवात केली होती. आता इथल्या प्रचारकांची संख्या दहा पटींनी वाढली आहे. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. यहोवा जे बदल घडवून आणतो त्यांना आजही आम्ही जुळवून घ्यायला तयार असलं पाहिजे. उदाहरणार्थ, अलीकडेच संघटनेत बरेच बदल झाले आहेत, आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची आमची तयारी आहे.

साक्षीदारांच्या संख्येत वाढ होत आहे ही गोष्ट आम्हाला नेहमी आनंदी करते

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी आम्ही दोघांनी बरीच मेहनत घेतली आहे. आणि यामुळेच आमचं जीवन खऱ्या अर्थाने समाधानी बनलं आहे. बांधवांची चांगल्या प्रकारे सेवा करता यावी यासाठीही आम्ही बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा हा निश्चय आहे की जोपर्यंत यहोवाची इच्छा आहे, तोपर्यंत “सर्वांना सर्व काही” होण्याची आमची तयारी आहे.

आम्ही आजही केझॉन शहरातील शाखा कार्यालयात सेवा करत आहोत