व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या

तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या

“कुमार व कुमारी, . . . परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत.”—स्तो. १४८:१२, १३.

१. अनेक तरुण ख्रिस्ती कोणत्या उत्तम संधींचा आनंद अनुभवत आहेत?

आपण अतिशय रोमांचक काळात जगत आहोत. इतिहासात यापूर्वी जे कधी घडले नाही ते आज घडत आहे. सर्व राष्ट्रांतील लाखो लोक खऱ्या उपासनेचा स्वीकार करत आहेत. (प्रकटी. ७:९, १०) अनेक तरुण-तरुणी बायबलमधील जीवनदायक सत्यांविषयी समजून घेण्यास इतरांना मदत करत आहेत. असे करताना त्यांना अतिशय आनंददायक अनुभव मिळत आहेत. (प्रकटी. २२:१७) काही तरुण इतरांसोबत बायबलचा अभ्यास करत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे जीवन सुधारण्यास त्यांना मदत करत आहेत. इतर काही तरुण परकीय भाषेच्या क्षेत्रांत आवेशाने सुवार्तेचा प्रचार करत आहेत. (स्तो. ११०:३; यश. ५२:७) यहोवाचे लोक करत असलेल्या या आनंददायक कार्यातील तुमचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल?

२. यहोवा तरुणांवर जबाबदाऱ्या सोपवण्यास इच्छुक आहे हे तीमथ्याच्या उदाहरणावरून कसे दिसून येते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

तरुण वयात तुम्ही असे निर्णय घेऊ शकता ज्यांमुळे नंतर देवाच्या सेवेतील अनेक उत्तम संधींचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. उदाहरणार्थ, तीमथ्याने सुज्ञपणे निर्णय घेतले होते. त्यामुळे, तो कदाचित वीसेक वर्षांचा होता तेव्हा त्याला मिशनरी म्हणून सेवा करण्याची नेमणूक मिळाली. (प्रे. कृत्ये १६:१-३) याच्या काही महिन्यांतच, तीव्र छळामुळे पौलाला नवीनच सुरू करण्यात आलेल्या थेस्सलनीका मंडळीला सोडून जावे लागले, तेव्हा त्याने तीमथ्यावर थेस्सलनीकाला जाऊन तेथील बांधवांचा विश्वास मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली. (प्रे. कृत्ये १७:५-१५; १ थेस्सलनी. ३:१, २, ६) तीमथ्याला ही नेमणूक मिळाली तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का?

 तुमचा सर्वात महत्त्वाचा निर्णय

३. तुम्ही जीवनात कोणता सर्वात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता, आणि हा निर्णय घेण्याची उत्तम वेळ कोणती?

तरुण वयात सहसा जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. पण, एक निर्णय असा आहे जो सर्वात महत्त्वाचा आहे; तो म्हणजे यहोवाची सेवा करण्याचा निर्णय. हा निर्णय घेण्याची उत्तम वेळ कोणती? यहोवा म्हणतो: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उप. १२:१) यहोवाला स्मरण्याचा किंवा आठवणीत ठेवण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे पूर्ण मनाने त्याची सेवा करणे. (अनु. १०:१२) पूर्ण मनाने देवाची सेवा करण्याचा निर्णय हा तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे तुमच्या संपूर्ण भविष्याला आकार मिळेल.—स्तो. ७१:५.

४. तुम्ही देवाची सेवा कशा प्रकारे कराल यावर कोणत्या महत्त्वाच्या निर्णयांचा प्रभाव पडू शकतो?

अर्थातच, यहोवाची सेवा करण्याच्या निर्णयाव्यतिरिक्त असे इतर निर्णयदेखील तुम्हाला घ्यावे लागतात ज्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, तुम्ही लग्न करणार की नाही, करणार तर कोणाशी करणार, आणि कोणती नोकरी करणार यांसारखे निर्णयदेखील तुम्हाला घ्यावे लागतील. हे सर्व निर्णय आवश्यक आहेत. पण, तुम्ही सर्वात आधी पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. (अनु. ३०:१९, २०) का बरे? कारण या निर्णयांचा एकमेकांशी संबंध आहे. लग्नाविषयी आणि नोकरीव्यवसायाविषयी तुम्ही जे निर्णय घ्याल त्यांचा प्रभाव तुम्ही देवाची सेवा कशा प्रकारे कराल यावर पडेल. (लूक १४:१६-२० पडताळून पाहा.) याच्या अगदी उलट, तुम्ही पूर्ण मनाने देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतल्यास याचा लग्नाविषयी आणि नोकरीव्यवसायाविषयी तुम्ही जे निर्णय घ्याल त्यांवर प्रभाव पडेल. तेव्हा, तुम्ही जीवनात सर्वात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टीला द्याल ते आधी ठरवा.—फिलिप्पै. १:१०.

तरुणपणात तुम्ही काय कराल?

५, ६. योग्य निर्णय घेतल्यास यहोवाच्या सेवेत आणखी संधी मिळू शकतात हे उदाहरणाच्या साहाय्याने सांगा. (याच अंकातील, “लहानपणी घेतलेला एक निर्णय,” हा लेखदेखील पाहा.)

देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो याचा तुम्ही विचार करू शकता, आणि त्याची सेवा कशा प्रकारे कराल हे ठरवू शकता. एका जपानी बांधवाने असे लिहिले: “मी १४ वर्षांचा होतो तेव्हा मंडळीतील एका वडिलांसोबत प्रचाराला गेलो. प्रचार कार्यात मला आनंद वाटत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी प्रेमळपणे मला म्हटलं: ‘युइचिरो, घरी जा आणि यहोवानं तुझ्यासाठी काय काय केलंय याबद्दल काळजीपूर्वक विचार कर.’ मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. खरं सांगायचं तर मी पुढेही काही दिवस याबद्दल विचार व प्रार्थना करत राहिलो. हळूहळू माझी मनोवृत्ती बदलली. लवकरच, यहोवाच्या सेवेत मला आनंद वाटू लागला. मी मिशनऱ्यांविषयी वाचू लागलो आणि पूर्ण मनानं देवाची सेवा करण्याविषयी विचार करू लागलो.”

युइचिरो पुढे म्हणतो: “मी जीवनात असे निर्णय घेण्यास सुरुवात केली ज्यांमुळं दुसऱ्या देशात जाऊन यहोवाची सेवा करणं मला शक्य होईल. उदाहरणार्थ, शाळेत असताना मी इंग्रजी भाषेचा कोर्स निवडला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, पायनियर सेवा करता यावी म्हणून मी इंग्रजी शिकवण्याची अर्धवेळेची नोकरी धरली. वीस वर्षांचा असताना, मी मंगोलियन भाषा शिकू लागलो आणि मंगोलियन भाषा बोलणाऱ्या प्रचारकांच्या समूहाला भेट देण्याची मला संधी मिळाली. दोन वर्षांनी, २००७ मध्ये मी मंगोलियाला भेट दिली. तिथं असताना काही पायनियरांसोबत मी प्रचाराला गेलो तेव्हा मी पाहिलं, की बऱ्याच लोकांना सत्यामध्ये आवड आहे. त्यामुळं, इथंच राहायला यावं आणि त्यांना मदत करावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. मी जपानला परतलो आणि मंगोलियाला जाऊन राहण्याची योजना केली. एप्रिल २००८ पासून मी मंगोलियामध्ये पायनियर म्हणून सेवा करत आहे. इथं जीवन तितकं सहजसोपं नाही. पण, लोक सुवार्तेला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्यांना यहोवाच्या जवळ येण्यास मदत करणं मला शक्य झालं आहे. मला वाटतं, की मी घेतलेला निर्णय हा जीवनातील सर्वोत्तम निर्णय आहे.”

७. जीवनात तुम्हाला कोणते निर्णय घ्यावे लागतील, आणि मोशेकडून आपण काय शिकू शकतो?

एक यहोवाचा साक्षीदार म्हणून तुम्ही जीवनात काय करणार हे तुम्ही स्वतः ठरवले पाहिजे. (यहो. २४:१५) लग्न करावे की नाही, कोणाशी करावे किंवा कोणती नोकरी करावी हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. ज्या नोकरीसाठी कमी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे अशा नोकरीची तुम्ही निवड कराल का? तुमच्यापैकी काही तरुण  खेड्यापाड्यांत राहतात; तर इतर काही जण मोठ्या शहरांत राहतात. जगभरात राहणाऱ्या तुम्हा तरुणांची व्यक्तिमत्त्वे, क्षमता, अनुभव, आवडीनिवडी, तसेच प्रत्येकाची आध्यात्मिक स्थिती भिन्न आहे. प्राचीन इजिप्तमध्ये मोशेचे जीवन जसे इतर इब्री तरुणांपेक्षा भिन्न होते तसेच तुमचे जीवनही कदाचित भिन्न असेल. राजाच्या मुलीचा पुत्र या नात्याने मोशे श्रीमंत होता, तर इब्री तरुण गुलाम होते. (निर्ग. १:१३, १४; प्रे. कृत्ये ७:२१, २२) तुमच्याप्रमाणेच ते अतिशय रोमांचक काळात जगत होते. (निर्ग. १९:४-६) पण, जीवनात काय करावे हे त्यांच्यापैकी प्रत्येकाने ठरवायचे होते. मोशेने यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्याची अगदी योग्य निवड केली.—इब्री लोकांस ११:२४-२७ वाचा.

८. जीवनात योग्य निर्णय घेण्यास तरुणांना कोठून साहाय्य मिळू शकते?

तुम्हाला योग्य निर्णय घेता यावेत म्हणून यहोवा तुम्हाला सल्ला देतो. तो हे कसे करतो? तो बायबलमधील तत्त्वांद्वारे तुम्हाला सल्ला देतो. ही तत्त्वे तुम्ही आपल्या जीवनातील खास परिस्थितीला लागू करू शकता. (स्तो. ३२:८) शिवाय, या तत्त्वांचा अवलंब कसा करता येईल हे समजण्यास तुमचे सत्यात असलेले पालक आणि मंडळीतील वडील तुम्हाला मदत करू शकतात. (नीति. १:८, ९) आता आपण बायबलमधील तीन मूलभूत तत्त्वांचा विचार करू या. या तत्त्वांचे पालन केल्यास तुम्हाला सुज्ञपणे निर्णय घेता येतील आणि तुमच्या जीवनाला योग्य आकार देता येईल.

तुम्हाला मदत करतील अशी तीन बायबल तत्त्वे

९. (क) निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देऊन यहोवाने कशा प्रकारे आपल्याला सन्मानित केले आहे? (ख) पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटल्याने आपल्याला कोणत्या संधी मिळतील?

पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा. (मत्तय ६:१९-२१, २४-२६, ३१-३४ वाचा.) यहोवाने आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देऊन सन्मानित केले आहे. तुम्ही आपल्या तरुणपणात किती काळ त्याच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी खर्च करावा हे तो सांगत नाही. पण, पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटणे महत्त्वाचे आहे असे येशूने शिकवले. तुम्ही राज्याला पहिले स्थान दिल्यास, तुम्हाला देवाबद्दल व इतरांबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक संधी मिळतील. शिवाय, सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल तुम्ही किती आभारी आहात हे दाखवण्याची संधीदेखील तुम्हाला मिळेल. लग्नासंबंधी आणि नोकरीसंबंधी तुम्ही जे निर्णय घेता त्यांवरून तुम्हाला देवाच्या राज्याविषयी व त्याच्या नीतिमत्त्वाविषयी आवेश असल्याचे दिसून येते का? की तुम्हाला भौतिक गरजांविषयीच जास्त चिंता असल्याचे तुमच्या निर्णयांवरून दिसून येते?

१०. येशूला कशामुळे आनंद व्हायचा, आणि आनंदी होण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?

१० इतरांची सेवा करण्यात आनंद मिळवा. (प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१, २४, ३५ वाचा.) येशूने प्रेमळपणे जीवनातील या मूलभूत तत्त्वाविषयी आपल्याला शिकवले. त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे न करता त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे केले त्यामुळे तो अतिशय आनंदी होता. नम्र मनाचे लोक सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत हे पाहून त्याला आनंद व्हायचा. (लूक १०:२१; योहा. ४:३४) इतरांना मदत केल्याने मिळणाऱ्या आनंदाचा कदाचित तुम्हीदेखील अनुभव घेतला असेल. येशूने शिकवलेल्या तत्त्वांनुसार जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेतल्यास तुम्हाला स्वतःला तर आनंद होईलच, शिवाय यहोवालाही आनंद होईल.—नीति. २७:११.

११. बारूखने त्याचा आनंद का गमावला, आणि यहोवाने त्याला कोणता सल्ला दिला?

११ यहोवाची सेवा केल्याने आपल्याला सर्वात जास्त आनंद होतो. (नीति. १६:२०) पण, यिर्मयाचा सचिव बारूख ही गोष्ट विसरला असे दिसते. त्याच्या जीवनात अशी एक वेळ आली जेव्हा त्याला यहोवाच्या सेवेत आनंद मिळत नव्हता. यहोवाने त्याला असे सांगितले: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नको, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, . . . पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.” (यिर्म. ४५:३, ५) तुम्हाला काय वाटते? बारूखला कशामुळे आनंद मिळाला असता, मोठ्या-मोठ्या गोष्टी मिळवल्याने की देवाचा विश्वासू सेवक या नात्याने जेरूसलेमच्या नाशातून बचावल्याने?—याको. १:१२.

१२. कोणते निर्णय घेतल्यामुळे रामीरो आज जीवनात आनंदी आहे?

१२ इतरांची सेवा केल्यामुळे ज्याला आनंद मिळाला असा एक बांधव म्हणजे रामीरो. तो म्हणतो: “मी अँडीज पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका खेड्यातील गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झालो. मी विद्यापीठात जाऊन शिक्षण घ्यावं अशी माझ्या थोरल्या भावाची इच्छा होती. आणि तो माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यास तयार  होता. ही माझ्याकरता एक मोठी संधी होती. पण, एक यहोवाचा साक्षीदार म्हणून मी नुकताच बाप्तिस्मा घेतला होता आणि माझ्यापुढे आणखी एक संधी आली होती. एका पायनियर बांधवानं मला एका लहानशा गावात येऊन राहण्याचं व त्याच्यासोबत प्रचार कार्य करण्याचं आमंत्रण दिलं. मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि आर्थिक रीत्या स्वतःचा सांभाळ करण्यासाठी केस कापण्याचं शिकून घेतलं व न्हाव्याचं दुकान सुरू केलं. तिथले बरेच लोक बायबलचा अभ्यास करायला आनंदानं तयार झाले.” नंतर, या ठिकाणी स्थानिक भाषेची एक मंडळी सुरू करण्यात आली. म्हणून त्याने या मंडळीसोबत सहवास करण्याचे ठरवले आणि मागील दहा वर्षांपासून तो येथे सेवा करत आहे. तो म्हणतो, की लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबलचा अभ्यास करण्यास मदत केल्यामुळे जो आनंद मिळतो तो आणखी कोणत्याही कामातून मिळू शकणार नाही.

रामीरो तरुण होता तेव्हापासूनच आनंदाने यहोवाची सेवा करत आहे (परिच्छेद १२ पाहा)

१३. तरुण वय हे पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करण्याचा सर्वोत्तम काळ आहे असे आपण का म्हणू शकतो?

१३ तारुण्यात यहोवाच्या सेवेत आनंद मिळवा. (उपदेशक १२:१ वाचा.) आधी एक चांगली नोकरी मिळवू या आणि नंतर पायनियर म्हणून सेवा करू या असा विचार करू नका. तरुण वय हे पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. या वयात अनेक तरुणांवर कुटुंबाच्या फार कमी जबाबदाऱ्या असतात. आव्हानात्मक नेमणुका स्वीकारण्यासाठी त्यांच्याजवळ उत्तम आरोग्य आणि उत्साह असतो. तुम्ही आपल्या तारुण्यात कोणकोणत्या मार्गांनी यहोवाची सेवा करणार? पायनियर बनण्याचे कदाचित तुमचे ध्येय असेल. परकीय भाषेच्या क्षेत्रात प्रचार करण्याची तुमची इच्छा असेल. किंवा तुमच्या मंडळीतच राहून प्रचार कार्यात जास्त योगदान देण्याची तुमची इच्छा असेल. देवाच्या सेवेत आणखी जास्त करण्याबद्दल तुमचे ध्येय कोणतेही असो, स्वतःचा खर्च चालवण्यासाठी तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग शोधावा लागेल. तुम्ही कोणते काम करण्याचे ठरवाल? त्यासाठी तुम्हाला किती प्रशिक्षण घ्यावे लागेल?

बायबल तत्त्वांच्या मदतीने सुज्ञपणे निर्णय घ्या

१४. नोकरी शोधताना कोणती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे?

१४ तुम्ही कोणती नोकरी कराल हे ठरवण्यास आतापर्यंत आपण चर्चा केलेली बायबलची तीन तत्त्वे तुम्हाला मदत  करू शकतात. तुमच्या भागात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे ठरवले आहे त्या भागात कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत हे शाळा-कॉलेजातील तुमच्या शिक्षकांना किंवा सरकारी संस्थांना कदाचित माहीत असेल. त्यांच्याकडून मिळणारी माहिती नोकरी शोधण्यात साहाय्यक ठरू शकते. पण ही माहिती घेताना सावधगिरी बाळगा. जे लोक यहोवावर प्रेम करत नाहीत ते कदाचित तुमच्या मनात या जगावर प्रेम करण्याचा मोह निर्माण करू शकतात. (१ योहा. २:१५-१७) या जगातील गोष्टींकडे तुम्ही पाहता तेव्हा तुमचे हृदय सहजासहजी तुमची फसवणूक करू शकते हे नेहमी लक्षात ठेवा.—नीतिसूत्रे १४:१५ वाचा; यिर्म. १७:९.

१५, १६. नोकरीची निवड करण्यासंबंधी तुम्हाला उत्तम सल्ला कोण देऊ शकतो?

१५ कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याची माहिती मिळाल्यावर, त्यांपैकी कोणती नोकरी निवडावी याविषयी योग्य सल्ला मिळवणे गरजेचे आहे. (नीति. १:५) बायबल तत्त्वांच्या साहाय्याने योग्य निवड करण्यास तुम्हाला कोण मदत करू शकेल? ज्या लोकांचे यहोवावर आणि तुमच्यावर प्रेम आहे व ज्यांना तुमच्याविषयी आणि तुमच्या परिस्थितीविषयी चांगली माहिती आहे अशांकडून सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या क्षमता, आवडीनिवडी आणि हेतू यांचे प्रामाणिकपणे परीक्षण करण्यास मदत करू शकतात. ते जे काही सांगतील त्यामुळे तुमच्या ध्येयांबद्दल पुन्हा विचार करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. तुमचे आईवडील सत्यात असतील, तर त्यांच्याकडून तुम्हाला बरीच मदत मिळू शकते. तसेच, आध्यात्मिक रीत्या प्रौढ असल्यामुळे मंडळीचे वडीलही तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. त्याचबरोबर, इतर पायनियरांशी आणि प्रवासी पर्यवेक्षकांशी याविषयी बोला. त्यांनी पूर्णवेळेची सेवा करण्याचा निर्णय का घेतला? त्यांनी पायनियर सेवेची सुरुवात कशी केली आणि ते आपला खर्च कसा चालवतात? सेवाकार्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?—नीति. १५:२२.

१६ जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात ते तुम्हाला सुज्ञ सल्ला देऊ शकतात. उदाहरणार्थ, कदाचित अभ्यास आवडत नसल्यामुळे तुम्ही शालेय शिक्षण मध्येच थांबवून पायनियर सेवा सुरू करण्याच्या विचारात असाल. शिक्षण सोडण्यामागचा तुमचा हेतू काय आहे हे तुमच्यावर प्रेम असलेली व्यक्ती चांगल्या प्रकारे ओळखू शकते. म्हणून, ती व्यक्ती तुम्हाला हे समजण्यास साहाय्य करेल की नेटाने प्रयत्न करून शालेय शिक्षण पूर्ण केल्यास सहजासहजी हार न मानण्याचा गुण तुम्हाला आत्मसात करता येईल. यहोवाची सेवा सर्वकाळ करत राहण्यासाठी हा गुण अत्यंत आवश्यक आहे.—स्तो. १४१:५; नीति. ६:६-१०.

१७. कोणत्या प्रकारची नोकरी करण्याचे आपण टाळले पाहिजे?

१७ यहोवाची सेवा करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात अशी परिस्थिती येऊ शकते ज्यामुळे त्याचा विश्वास कमकुवत होऊ शकतो आणि तो यहोवापासून दूर जाऊ शकतो. (१ करिंथ. १५:३३; कलस्सै. २:८) काही प्रकारच्या नोकऱ्या इतर नोकऱ्यांच्या तुलनेत तुमच्या विश्वासाला जास्त धोकादायक ठरू शकतात. एखादी विशिष्ट प्रकारची नोकरी करण्याचे ठरवल्यामुळे काही जणांनी त्यांचा विश्वास गमावल्याचे कदाचित तुमच्या पाहण्यात आले असेल. (१ तीम. १:१९) तेव्हा, ज्या नोकरीमुळे देवासोबतचा तुमचा नातेसंबंध धोक्यात येईल अशी नोकरी टाळण्यातच सुज्ञता आहे.—नीति. २२:३.

तरुणांनो, आनंदाने यहोवाची सेवा करा

१८, १९. पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात अद्याप निर्माण झाली नसेल, तर तुम्ही काय केले पाहिजे?

१८ तुम्ही आपल्या मनात यहोवाची सेवा करण्याची इच्छा विकसित केली असेल, तर तारुण्यात त्याची सेवा करण्याच्या ज्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत त्यांचा फायदा घ्या. असे निर्णय घ्या ज्यांमुळे तुम्हाला या रोमांचक काळात यहोवाची सेवा आनंदाने करता येईल.—स्तो. १४८:१२, १३.

१९ पण, पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात अद्याप निर्माण झाली नसेल, तर तुम्ही काय केले पाहिजे? तुमचा विश्वास आणखी दृढ करण्याचे थांबवू नका. देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पौलाने काय केले हे स्पष्ट केल्यानंतर त्याने असे लिहिले: “तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हाला प्रगट करेल; तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.” (फिलिप्पै. ३:१५, १६) यहोवाचे तुमच्यावर प्रेम आहे आणि त्याचा सल्ला सर्वोत्तम असतो हे नेहमी लक्षात ठेवा. इतर कोणाहीपेक्षा, केवळ यहोवाच तुम्हाला तारुण्यात सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करू शकतो.