व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 बायबलने बदलले जीवन!

“लोक माझा द्वेष करायचे”

“लोक माझा द्वेष करायचे”
  • जन्म: १९७८

  • देश: चिली

  • माझा गतकाळ: अतिशय हिंसक

माझी पूर्व जीवनशैली:

मी चिलीतील सँटियागो या राजधानी शहरात लहानाचा मोठा झालो. या ठिकाणी ड्रग्ज, टोळ्या आणि गुन्हे या गोष्टी सर्वसामान्य होत्या. मी पाच वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा खून करण्यात आला. त्यानंतर, माझी आई अशा एका माणसाबरोबर राहू लागली जो खूप क्रूर होता. तो आम्हा दोघांना खूप मारायचा. त्या काळचे व्रण अजूनही माझ्या मनावर ताजे आहेत.

मोठा होत असताना नकारात्मक गोष्टींबद्दल मी अतिशय हिंसक वृत्ती दाखवू लागलो. मी हेवी-मेटल संगीत ऐकू लागलो, खूप दारू पिऊ लागलो आणि अधूनमधून ड्रग्ज घेऊ लागलो. ड्रग्ज विक्रेत्यांशी रस्त्यांवर माझी नेहमी भांडणं व्हायची आणि बऱ्याचदा त्यांनी मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा, शत्रू टोळीनं माझा खून करण्यासाठी एका कुख्यात गुंड्याला सुपारी दिली; त्या हल्ल्यात मी फक्त जखमी झालो आणि त्यांच्या तावडीतून सुटलो. दुसऱ्या एका वेळेस, काही ड्रग्ज विक्रेत्यांनी माझा गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न केला.

१९९६ साली मी कॅरोलिना नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडलो आणि १९९८ मध्ये आम्ही लग्न केलं. आम्हाला एक मुलगा झाला. माझ्या हिंसक स्वभावामुळं मीसुद्धा माझ्या सावत्र वडिलांसारखंच माझ्या बायकोमुलाचा छळ करेन या विचारानं मी भेदरलो. म्हणून मी पुनर्वसन केंद्राकडून मदत घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर औषधोपचार करण्यात आले पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. कारण त्यानंतरसुद्धा छोट्या-छोट्या गोष्टींवरून माझा पारा चढायचा; माझ्या रागावर माझा ताबा राहिला नव्हता. माझ्यामुळं माझ्या बायकोमुलाला त्रास होऊ नये म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तोही प्रयत्न फसला.

मी खूप वर्षांपासून नास्तिक होतो, पण आता मला देवाला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं काही काळ मी इव्हॅन्जलिकल धर्माशी सहवास राखू लागलो. त्याच वेळी माझी बायको यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागली. मला साक्षीदारांचा प्रचंड राग यायचा आणि मी त्यांना शिवीगाळ करायचो. पण आश्चर्य म्हणजे, ते नेहमी माझ्याशी शांतपणे वागायचे.

एकदा कॅरोलिनानं मला माझ्या स्वतःच्या बायबलमधून स्तोत्र ८३:१८ हे वचन वाचायला सांगितलं. त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की देवाचं नाव यहोवा आहे. हे जाणून मला आश्चर्य वाटलं, कारण माझ्या धर्मात मी देवाबद्दल शिकलो होतो, पण यहोवाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. नंतर,  २००० सालच्या सुरुवातीला मीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागलो.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

मी जसजशी प्रगती करत गेलो तसतसं मला हे जाणून सांत्वन मिळालं की यहोवा हा दयाळू आणि क्षमा करणारा देव आहे. उदाहरणार्थ, निर्गम ३४:६, ७ या वचनांत यहोवाचं असं वर्णन करण्यात आलं आहे: “परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा,” आहे.

पण तरीही मी जे काही शिकत होतो ते लागू करणं इतकं सोपं नव्हतं. मी माझ्या रागावर कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही, मी अगदीच कुचकामी आहे असं मला वाटायचं आणि त्यामुळं मी खूप निराश व्हायचो. पण कॅरोलिना नेहमी मला आधार द्यायची. मी जे काही प्रयत्न करतो त्याची यहोवा दखल घेतो याची आठवण ती मला करून द्यायची. आणि त्यामुळंच यहोवाला आनंदी करण्याचा मी सतत प्रयत्न करू शकलो.

एकदा, माझा बायबल अभ्यास घेणाऱ्या ऑलेहॉन्ड्रो या बांधवानं मला गलतीकर ५:२२, २३ ही वचने वाचायला सांगितली. त्यांत म्हटलं आहे की, “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” हे देवाच्या आत्म्याचं फळ आहे. हे गुण मी स्वतःच्या बळावर नव्हे, तर देवाच्या आत्म्याच्या मदतीनं विकसित करू शकतो असं मला ऑलेहॉन्ड्रो यांनी सांगितलं. हे जाणून माझा दृष्टिकोनच बदलला!

नंतर, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मोठ्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. तिथली सुव्यवस्था, स्वच्छता आणि बंधुप्रेम पाहून मला या गोष्टीची खातरी पटली की मला खरा धर्म मिळाला आहे. (योहान १३:३४, ३५) मी फेब्रुवारी २००१ साली बाप्तिस्मा घेतला.

मला काय फायदा झाला:

यहोवानं माझं एका हिंसक व्यक्तीतून एका शांतिप्रिय व्यक्तीत रूपांतर केलं. जणू दलदलीत फसलेल्या मला त्यानं बाहेर काढलं. लोक माझा द्वेष करायचे, पण त्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. आज मात्र मी, माझी पत्नी आणि दोन मुलं शांतीनं यहोवाची सेवा करत आहेत.

माझ्या नातेवाइकांना आणि पूर्वीच्या मित्रांना विश्वासच बसत नाही की माझ्यात इतका बदल झाला आहे. त्यामुळं त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी बायबलमधलं सत्य शिकण्याची इच्छा दाखवली आहे. इतरांना यहोवाबद्दल शिकवण्याचा बहुमानही मला मिळाला आहे. बायबलमधल्या सत्यामुळं त्यांच्यात बदल होताना पाहून मला खूप आनंद होतो! ▪ (w13-E 10/01)