व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 वाचक विचारतात . . .

देव शक्तिशाली लोकांकडून कमजोरांवर जुलूम का होऊ देतो?

देव शक्तिशाली लोकांकडून कमजोरांवर जुलूम का होऊ देतो?

शक्तिशाली लोकांनी कमजोरांवर जुलूम केल्याचे काही अहवाल बायबलमध्ये सापडतात. हे अहवाल वाचून आपल्याला खूप वाईट वाटते. असाच एक अहवाल नाबोथाविषयीचा आहे. इ.स.पू. दहाव्या शतकात इस्राएलचा राजा अहाब याला नाबोथाचा द्राक्षमळा हवा होता. त्यासाठी त्याची पत्नी ईजबेल हिने एक कट रचला व नाबोथ आणि त्याच्या पुत्रांना जिवे मारले. (१ राजे २१:१-१६; २ राजे ९:२६) अधिकाराचा असा वाईट उपयोग देवाने कसा खपवून घेतला?

“देव खोटे बोलत नाही.”—तीत १:२.

यासाठी आपण एका महत्त्वपूर्ण कारणाचा विचार करू या; ते म्हणजे देव खोटे बोलत नाही. (तीत १:२, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण, जुलमासारख्या दुष्ट कामांशी याचा काय संबंध? मानवजातीच्या सुरुवातीलाच देवाने मानवांना ताकीद दिली होती की त्याच्याविरुद्ध बंड केल्यास त्याचा परिणाम भयंकर होईल, म्हणजे त्यांच्यावर मृत्यू ओढवेल. देवाचे शब्द अगदी खरे ठरले, कारण एदेन बागेत झालेल्या बंडाळीनंतर मानवांच्या वाट्याला मरण आले. खरेतर, सर्वात पहिला मृत्यू जुलमासारख्या वाईट कृत्यामुळेच झाला, जेव्हा काइनाने त्याचा भाऊ हाबेल याचा वध केला.—उत्पत्ति २:१६, १७; ४:८.

तेव्हापासून मानव इतिहासात जे काही घडले आहे त्याविषयी देवाच्या वचनात असे म्हटले आहे: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) हे शब्द खरे ठरले आहेत का? यहोवा देवाने त्याच्या लोकांना म्हणजे इस्राएल राष्ट्राला अशी ताकीद दिली की त्यांच्यावर राज्य करणारे राजे त्यांच्यावर जुलूम करतील आणि त्याचे लोक मदतीसाठी त्याच्याजवळ याचना करतील. (१ शमुवेल ८:११-१८) बुद्धिमान राजा शलमोन यानेसुद्धा आपल्या लोकांवर भारी कर लावून त्यांच्यावर जुलूम केला. (१ राजे ११:४३; १२:३, ४) अहाबासारख्या दुष्ट राजांनी तर लोकांवर कितीतरी पटीने जास्त जुलूम केला. जरा विचार करा: देवाने जर जाचजुलूम रोखले असते तर त्याचा शब्द खोटा ठरला नसता का?

“एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.

ही गोष्टदेखील लक्षात ठेवा की सैतानाने असा दावा केला आहे की लोक स्वार्थी कारणांसाठी देवाची सेवा करतात. (ईयोब १:९, १०; २:४) जर देवाने त्याच्या सर्व सेवकांचे सर्व प्रकारच्या जाचजुलमापासून रक्षण केले असते, तर सैतानाचा दावा खरा ठरला नसता का? आणि देवाने जर प्रत्येकाला सर्व जाचजुलमापासून वाचवले असते तर तो आणखी मोठा लबाड ठरला नसता का? जर मानवांना जुलमापासून रक्षण मिळाले असते, तर त्यांनी असा विचार केला असता की मानव देवाशिवाय यशस्वी रीत्या राज्य करू शकतात. पण देवाचे वचन याच्या अगदी उलट सांगते. त्यात सांगितले आहे की मानव स्वतःवर बिलकूल राज्य करू शकत नाहीत. (यिर्मया १०:२३) आपल्याला देवाच्या राज्याची गरज आहे; केवळ त्याच्या राज्यातच अन्यायाचा अंत होईल.

तर मग याचा असा अर्थ होतो का की देव जाचजुलमाविषयी काहीच करत नाही? याचा असा अर्थ होत नाही. देव दोन गोष्टी करतो. पहिली गोष्ट म्हणजे, लोक जाचजुलूम का करतात याविषयी देव तपशीलवार माहिती देतो. उदाहरणार्थ, नाबोथाविरुद्ध ईजबेलने जो कट रचला होता त्याबद्दलची तपशीलवार माहिती त्याच्या वचनात उघडपणे सांगितलेली आहे. बायबलमध्ये हेही सांगण्यात आले आहे की अशी दुष्ट कृत्ये करण्याचे प्रोत्साहन एक शक्तिशाली शासक देतो जो आपली ओळख लोकांपासून लपवू इच्छितो. (योहान १४:३०; २ करिंथकर ११:१४) हा शक्तिशाली शासक दियाबल सैतान आहे असे बायबल सांगते. दुष्टता आणि जाचजुलूम यांसारख्या गोष्टी उघडकीस आणून देव आपल्याला दुष्ट कृत्यांपासून दूर राहण्यास मदत करतो. या मदतीचा स्वीकार केल्यास आपण सदासर्वकाळ जिवंत राहू शकतो.

दुसरी गोष्ट, देव आपल्याला पक्की आशा देतो की तो लवकरच जाचजुलमाचा अंत करेल. अहाब व ईजबेल यांसारख्या अनेक लोकांनी जे जाचजुलूम केले ते देवाने उघडकीस आणले, त्यांचा न्याय केला आणि त्यांना शिक्षा दिली. यामुळे देव दुष्ट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा देईल असे त्याने दिलेल्या अभिवचनावरील आपला भरवसा आणखी वाढतो. (स्तोत्र ५२:१-५) दुष्टाईमुळे होणाऱ्या वाईट परिणामांना देव लवकरच नाहीसे करेल अशी पक्की आशादेखील तो आपल्याला देतो. * लवकरच असा काळ येईल जेव्हा विश्वासू नाबोथ व त्याची मुले या पृथ्वीवरील नंदनवनात जीवन जगतील ज्यात अन्यायाचा लवलेशही नसेल.—स्तोत्र ३७:३४. ▪ (w14-E 02/01)

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.