व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का?

प्रार्थना ऐकणारा कुणी आहे का?

प्रार्थना ऐकणारा कुणी आहे का?

‘प्रार्थना ऐकणारा कुणीही नाही, उगाच वेळ वाया जातो,’ असं काहींना वाटतं. इतरांनी प्रार्थना केली, पण काहीच उत्तर मिळालं नाही असं त्यांना वाटतं. एका नास्तिक व्यक्तीनं देव कसा असावा याची मनात कल्पना केली. मग त्यानं त्या काल्पनिक देवाला प्रार्थनेत म्हटलं, “देवा, तू माझ्याशी काही तरी बोल; अगदी हळू आवाजात बोललं तरी चालेल.” पण देवाकडून काहीच उत्तर आलं नाही असं त्याचं म्हणणं आहे.

पण बायबलमध्ये सांगितलं आहे, की देव आहे आणि तो आपल्या प्रार्थना ऐकतो. प्राचीन काळातील इस्राएली लोकांना उद्देशून बायबलमध्ये असं सांगितलं होतं: “सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील; तू इतःपर कधी शोक करणार नाहीस; तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुजवर कृपा करेलच; तो ऐकताच तो तुला पावेल [उत्तर देईल].” (यशया ३०:१९) आणखी एका शास्त्रवचनात असं म्हटलं आहे: “दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो; परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंदविते.”—नीतिसूत्रे १५:८.

येशूनं त्याच्या पित्याला प्रार्थना केली “आणि ती . . . ऐकण्यात आली.”—इब्री लोकांस ५:७

बायबलमध्ये अशा अनेक लोकांची उदाहरणं आहेत ज्यांच्या प्रार्थना देवानं ऐकल्या होत्या. येशूनं त्याला “मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ . . . विनवणी केली, आणि ती . . . ऐकण्यात आली” असं एका शास्त्रवचनात सांगितलं आहे. (इब्री लोकांस ५:७) अशी आणखी उदाहरणं बायबलमधील दानीएल ९:२१ आणि २ इतिहास ७:१ या वचनांत तुम्हाला वाचता येतील.

मग काही लोकांना, आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही असं का वाटतं? आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात म्हणून दुसऱ्या कोणत्याही देवाला किंवा आपल्या पूर्वजांना प्रार्थना न करता आपण फक्त खरा देव यहोवा यालाच * प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण “त्याच्या इच्छेप्रमाणे” म्हणजेच त्याच्या नजरेत योग्य अशा गोष्टी मागाव्यात, अशी तो अपेक्षा करतो. अशा रीतीनं प्रार्थना केल्यावर “तो आपले ऐकेल” असं तो आश्वासन देतो. (१ योहान ५:१४) म्हणून आपल्या प्रार्थना ऐकल्या जाण्यासाठी आपण बायबलमध्ये ज्या देवाबद्दल सांगितलं आहे त्याच्याबद्दल आणि त्याची इच्छा काय आहे ते शिकून घेतलं पाहिजे.

प्रार्थना करणं हा एक नित्यक्रम नाही, तर देवाबरोबरचं संभाषण आहे आणि देव खरंच प्रार्थना ऐकून त्यांचं उत्तर देतो असा बऱ्याच लोकांचा विश्वास आहे. केनियामध्ये राहणारा आयझक म्हणतो: “मी बायबल समजण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर लगेच एका व्यक्तीनं मला भेटून मला हवी असलेली मदत पुरवली.” फिलिपीन्झमध्ये राहणारी हिल्डा धूम्रपानाची सवय सोडण्याचा प्रयत्न करत होती. तिचे बरेच प्रयत्न निष्फळ ठरल्यावर तिच्या पतीनं सुचवलं, “यहोवाला प्रार्थना करून पाहा.” तिनं तसं केलं. ती म्हणते: “आश्चर्याची गोष्ट म्हणजे यहोवानं मला खरंच मदत केली. हळूहळू, धूम्रपान करण्याची माझी इच्छा कमी झाली आणि ती सवय मी सोडू शकले.”

तुम्हाला काही वैयक्तिक समस्या असतील आणि त्यांचं निवारण करणं हे यहोवाच्या इच्छेनुसार असेल तर तो तुम्हाला मदत करेल का? (w15-E 10/01)

^ परि. 6 यहोवा हे देवाचं नाव आहे असं बायबलमध्ये सांगितलं आहे.