व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय तेवीस

आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला

आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला

१. पेत्राच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण कोणता असावा?

पेत्राची आणि येशूची नजरानजर झाली तो क्षण पेत्र कधीच विसरणार नव्हता. येशूच्या नजरेत त्याला कुठंतरी निराशा किंवा राग दिसला असावा का? ते आपल्याला नक्की सांगता येणार नाही, कारण बायबल आपल्याला फक्त इतकंच सांगतं, की “प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली.” (लूक २२:६१) पण, त्या एका नजरेत पेत्राला एक गोष्ट तीव्रपणे जाणवली. ती म्हणजे, आपण किती मोठी आणि भयंकर चूक करून बसलो आहोत हे त्याला कळून चुकलं. येशूनं त्याच्याबद्दल जे सांगितलं होतं नेमकं तेच तो करून बसला होता. आपलं येशूवर खूप प्रेम आहे आणि आपण त्याला कधीच नाकारणार नाही असं तो मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाला होता. पण, आता त्यानं नेमकं हेच केलं होतं; त्यानं आपल्या गुरूला नाकारलं होतं. तो पेत्रासाठी अतिशय दुःखद क्षण होता; कदाचित त्याच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आणि सगळ्यात वाईट क्षण.

२. पेत्राला कोणता धडा शिकण्याची गरज होती, आणि त्याच्याकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे?

पण सगळंकाही संपलं होतं असा याचा अर्थ होत नाही. कारण पेत्र हा भक्कम विश्वास असलेला मनुष्य होता. त्यामुळं आपल्या चुका सुधारण्याची आणि इतरांना क्षमा करण्याचा अतिशय महत्त्वाचा धडा येशूकडून शिकून घेण्याची संधी त्याला होती. खरंतर, आपल्यापैकी प्रत्येकालाच तो धडा शिकण्याची गरज आहे. तेव्हा, पेत्राच्या हातून कोणत्या चुका घडल्या आणि त्यांतून तो हा महत्त्वाचा धडा कसा शिकला ते आपण पाहू या.

त्याला बरंच शिकावं लागणार होतं

३, ४. (क) पेत्रानं येशूला कोणता प्रश्न विचारला, आणि त्यानं कदाचित काय विचार केला असेल? (ख) पेत्रावर त्या काळातील लोकांच्या मनोवृत्तीचा प्रभाव पडला होता हे येशूनं कसं दाखवून दिलं?

जवळजवळ सहा महिन्यांपूर्वी कफर्णहूम या आपल्या गावी असताना पेत्रानं येशूला एक प्रश्न विचारला होता. त्यानं येशूला विचारलं: “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” सात वेळा क्षमा करण्याची तयारी दाखवून आपण खूप मोठ्या मनाचे आहोत असं कदाचित पेत्र सुचवत असावा. कारण, एखाद्याला फक्त तीन वेळा माफ केलं जावं असं त्या काळातले धर्मगुरू लोकांना शिकवायचे. पण, येशूनं पेत्राला म्हटलं: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.”—मत्त. १८:२१, २२.

एखाद्यानं आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा आपण हिशोब ठेवावा असं येशूला म्हणायचं होतं का? नाही. उलट, “साताच्या सत्तर वेळा” असं म्हणण्याद्वारे येशूला असं सांगायचं होतं, की आपलं एकमेकांवर प्रेम असेल तर आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब न ठेवता उदारपणे इतरांना क्षमा करणं आपल्याला शक्य होईल. (१ करिंथ. १३:४, ५) येशूनं जे म्हटलं त्यावरून त्या काळातील लोकांच्या मनोवृत्तीचा पेत्रावर किती प्रभाव पडला होता हे त्यानं दाखवून दिलं. त्या काळी लोक इतरांशी कठोरतेनं वागायचे आणि जणू मोजूनमापून एखाद्याला क्षमा करायचे. पण, देवाची क्षमाशीलता अपरंपार आहे; तो उदारपणे क्षमा करतो.—१ योहान १:७-९ वाचा.

५. कधीकधी, इतरांना क्षमा करण्याचं महत्त्व आपल्याला केव्हा समजतं?

येशूनं जे म्हटलं त्यावर पेत्रानं वाद घातला नाही. पण, येशूला जो महत्त्वाचा धडा त्याला शिकवायचा होता तो त्यानं खरंच मनावर घेतला का? कधीकधी, आपल्या स्वतःला क्षमेची किती गरज आहे याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हाच आपल्याला इतरांना क्षमा करण्याचं महत्त्व कळतं. येशूनं शिकवलेला धडा खरंच पेत्राच्या हृदयापर्यंत गेला होता की नाही, हे पाहण्यासाठी येशूचा मृत्यू होण्याआधीच्या काही तासांत कोणकोणत्या घटना घडल्या त्यांवर आपण पुन्हा विचार करू या. त्या खडतर प्रसंगी, पेत्राच्या हातून अशा बऱ्याच चुका झाल्या ज्यांबद्दल येशूनं त्याला क्षमा केली.

येशूनं पेत्राला कित्येकदा क्षमा केली

६. येशू आपल्या प्रेषितांना नम्रतेविषयी शिकवत असताना पेत्रानं काय म्हटलं, आणि तरीसुद्धा येशू त्याच्याशी कसा वागला?

ती एक अविस्मरणीय रात्र होती. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाची अखेरची रात्र. खरंतर, येशूला आपल्या प्रेषितांना आणखी बरंच काही शिकवायचं होतं. उदाहरणार्थ, त्याला त्यांना नम्र राहायला शिकवायचं होतं. येशूने नम्रपणे आपल्या प्रेषितांचे पाय धुण्याद्वारे त्यांच्यासमोर एक उदाहरण मांडलं. त्या काळी, घरातल्या नोकरांपैकी जो सगळ्यात कनिष्ठ असायचा तोच सहसा हे काम करायचा. येशू शिष्यांचे पाय धुणार हे पाहून सुरुवातीला पेत्रानं त्याला टोकलं. मग, येशू त्याच्याजवळ आला तेव्हा त्याच्याकडून आपले पाय धुवून घेण्यास त्यानं स्पष्ट नकार दिला. आणि पुढच्याच क्षणी, येशूनं फक्त आपले पायच नाही, तर आपले हात आणि डोकंही धुवावं असा हट्ट तो करू लागला. पेत्राच्या अशा वागण्यामुळे येशूचा धीर सुटला नाही. उलट, आपल्या या कृतीचा अर्थ आणि तिचं महत्त्व येशूनं शांतपणे समजावून सांगितलं.—योहा. १३:१-१७.

७, ८. (क) पेत्रानं आणखी कशा प्रकारे येशूच्या धीराची परीक्षा पाहिली? (ख) येशू कशा प्रकारे एक प्रेमळ, क्षमाशील मनोवृत्ती दाखवत राहिला?

या घटनेच्या थोड्याच वेळानंतर, पेत्रानं आणखी एकदा येशूच्या धीराची परीक्षा पाहिली. आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यावर प्रेषित एकमेकांशी वाद घालू लागले. येशूच्या शिष्यांनी अशी अहंकारी वृत्ती दाखवणं ही खरंतर एक लाजिरवाणी गोष्ट होती आणि नक्कीच त्यात पेत्रही सामील असेल. असं असलं, तरी येशूनं त्यांना अगदी प्रेमळपणे समजावून सांगितलं. इतकंच नाही, तर त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल अर्थात त्याला एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यानं त्यांची प्रशंसाही केली. पण त्याच वेळी त्यानं असं म्हटलं, की ते सगळे त्याला सोडून जातील. त्यावर पेत्र पटकन म्हणाला, की आपल्याला मरण सोसावं लागलं तरी आपण येशूला कधीच सोडणार नाही. पण, येशूनं भाकीत केलं, की त्याच रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी पेत्र त्याला तीन वेळा नाकारेल. त्या वेळी पेत्रानं येशूचं बोलणं मान्य तर केलंच नाही, उलट अशी फुशारकी मारली, की इतर सर्व प्रेषितांपेक्षा तो त्याला विश्वासू राहील.—मत्त. २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; लूक २२:२४-२८; योहा. १३:३६-३८.

आता तर येशूचा धीर नक्कीच सुटला असेल, असं कदाचित आपल्याला वाटेल. पण तसं मुळीच घडलं नाही. उलट, त्या संपूर्ण कठीण काळातही येशू आपल्या अपरिपूर्ण प्रेषितांचे चांगले गुणच पाहत राहिला. पेत्र आपल्याला नाकारणार हे येशूला माहीत होतं. तरीसुद्धा तो म्हणाला: “तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” (लूक २२:३२) पेत्र आपल्या चुकांबद्दल पश्‍चात्ताप करून पुन्हा विश्वासूपणे देवाची सेवा करेल असा भरवसा येशूनं या शब्दांतून व्यक्त केला. खरंच, त्यानं किती प्रेमळ, क्षमाशील मनोवृत्ती दाखवली!

९, १०. (क) गेथशेमाने बागेत पेत्राच्या हातून कोणत्या चुका झाल्या? (ख) पेत्राच्या उदाहरणावरून कोणती गोष्ट लक्षात येते?

नंतर, गेथशेमाने बागेतसुद्धा येशूला एकदा नव्हे, तर बऱ्याचदा पेत्राची चूक त्याच्या लक्षात आणून द्यावी लागली. येशू प्रार्थना करायला गेला तेव्हा त्यानं पेत्राला आणि त्याच्यासोबत याकोब आणि योहान यांना जागं राहण्यास सांगितलं होतं. येशू भयंकर तणावाखाली होता आणि त्याला आधाराची खूप गरज होती. पण, पेत्र आणि इतर जण मात्र वारंवार झोपी गेले. तरीसुद्धा, येशूनं त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि त्यांना माफ केलं. त्यानं म्हटलं: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.”—मार्क १४:३२-४१.

१० मग, थोड्याच वेळानंतर लोकांचा एक मोठा जमाव मशाली, तलवारी आणि सोटे घेऊन तिथं आला. खरंतर, ही सावधपणे आणि विचारपूर्वक वागण्याची वेळ होती. पण, पेत्र मात्र अविचारीपणे वागला. त्यानं प्रमुख याजकाचा दास, मल्ख याच्यावर तलवारीनं वार करून त्याचा कान छाटून टाकला. या वेळीसुद्धा येशूनं अतिशय शांतपणे पेत्राची चूक सुधारली; मल्खाची जखम बरी केली आणि हिंसा न करण्याचं तत्त्व शिकवलं. आजही येशूचे अनुयायी या तत्त्वाचं पालन करतात. (मत्त. २६:४७-५५; लूक २२:४७-५१; योहा. १८:१०, ११) याआधीसुद्धा पेत्राच्या हातून बऱ्याच चुका झाल्या होत्या आणि प्रत्येक वेळी येशूनं त्याला क्षमा केली होती. त्याच्या या उदाहरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते; ती म्हणजे, आपण सर्वच वारंवार चुकतो. (याकोब ३:२ वाचा.) आपल्यापैकी असा कोण आहे ज्याला दररोज देवाच्या क्षमेची गरज पडत नाही? पण, पेत्रासाठी अजूनही ती रात्र संपली नव्हती. त्या रात्री त्याच्या हातून आणखी गंभीर चुका होणार होत्या.

पेत्रानं केलेली सगळ्यात मोठी चूक

११, १२. (क) येशूला धरून नेण्यात आलं तेव्हा पेत्रानं काही प्रमाणात धैर्य कसं दाखवलं? (ख) पेत्र काय करण्यात कमी पडला?

११ येशू जमावाला म्हणाला, की ते जर त्याला धरायला आले असतील, तर त्यांनी प्रेषितांना जाऊ द्यावं. ते येशूला धरून नेत असताना पेत्र असाहाय्यपणे नुसताच पाहत राहिला. मग, इतर प्रेषितांप्रमाणे तोही येशूला सोडून पळून गेला.

१२ पळून जात असताना पेत्र आणि योहान मधेच एका ठिकाणी थांबले. पूर्वी प्रमुख याजक असलेल्या हन्नाच्या घराजवळ कदाचित ते थांबले असावेत. कारण येशूची चौकशी करण्यासाठी सगळ्यात आधी त्याला इथंच आणण्यात आलं होतं. तिथून येशूला घेऊन जात असताना, पेत्र आणि योहान त्याच्या मागेमागे चालू लागले, पण ‘दुरूनच.’ (मत्त. २६:५८; योहा. १८:१२, १३) पेत्र हा काही भित्रा नव्हता. येशूच्या मागे जाण्यासाठीसुद्धा धैर्याची गरज होती. कारण जमावाकडे हत्यारं होती आणि काही वेळापूर्वीच पेत्रानं त्यांच्यापैकी एकाला जखमी केलं होतं. तेव्हा, येशूच्या मागे जाऊन पेत्रानं धैर्य नक्कीच दाखवलं. तरी, येशूसाठी आपण मरणही सोसण्यास तयार असू असं जे त्यानं आधी म्हटलं होतं, तसं एकनिष्ठ प्रेम या प्रसंगी त्याच्या वागण्यातून दिसून आलं नाही.—मार्क १४:३१.

१३. ख्रिस्ताचं योग्यपणे अनुसरण करण्याचा कोणता एकच मार्ग आहे?

१३ पेत्राप्रमाणेच आज अनेक जण “दुरून” म्हणजे इतरांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे ख्रिस्ताचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. पण, पुढं पेत्रानं लिहिलं त्याप्रमाणे ख्रिस्ताचं योग्यपणे अनुसरण करण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे, शक्य तितक्या जवळून त्याच्यासारखा विचार करण्याचा व वागण्याचा प्रयत्न करणं. आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही परिणामांना तोंड द्यावं लागलं तरी आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे.—१ पेत्र २:२१ वाचा.

१४. येशूची चौकशी चालली होती त्या रात्री पेत्र काय करत होता?

१४ येशूच्या मागेमागे सावधपणे जाणाऱ्या पेत्राची पावलं, शेवटी जेरूसलेमधील एका अतिशय दिमाखदार वाड्याच्या फाटकाजवळ थबकली. कयफा या श्रीमंत आणि दबदबा असलेल्या प्रमुख याजकाचं ते घर होतं. सहसा अशा घरांच्या मधोमध मोठं अंगण आणि समोर फाटक असायचं. पेत्र त्या घराच्या फाटकाजवळ आला तेव्हा दासीनं त्याला आत सोडलं नाही. पण, योहान हा प्रमुख याजकाला ओळखत असल्यामुळे दासीनं त्याला आधीच आत सोडलं होतं. त्यामुळं तो फाटकापाशी आला आणि पेत्राला आत सोडण्यास त्यानं दासीला सांगितलं. पण, असं दिसतं, की पेत्रानं योहानाला साथ दिली नाही; शिवाय, येशूच्या पाठीशी उभं राहता यावं म्हणून त्यानं घरात जाण्याचाही प्रयत्न केला नाही. उलट, रात्रीच्या थंडीत तो अंगणातच शेकोटीजवळ काही नोकरचाकरांबरोबर बसून राहिला. आतमध्ये येशूची चौकशी चालली होती. येशूविरुद्ध खोटी साक्ष देणाऱ्या लोकांना घरात ये-जा करताना तो पाहत होता.—मार्क १४:५४-५७; योहा. १८:१५, १६, १८.

१५, १६. पेत्र तीन वेळा आपल्याला नाकारेल असं जे येशू म्हणाला होता ते कसं पूर्ण झालं?

१५ फाटकाजवळ असलेल्या ज्या दासीनं पेत्राला आत सोडलं होतं तिला शेकोटीच्या प्रकाशात पेत्राचा चेहरा स्पष्ट दिसला. तिनं पटकन त्याला ओळखलं आणि म्हणाली: “तूही गालीली येशूबरोबर होतास.” एकाएकी गोंधळून गेल्यामुळे पेत्रानं येशूला ओळखत असल्याचं नाकारलं. इतकंच नव्हे, तर ती काय म्हणत आहे तेसुद्धा आपल्याला समजत नसल्याचं तो म्हणाला. मग, लोकांच्या नजरा चुकवून तो फाटकाजवळ गेला तेव्हा दुसऱ्या एका मुलीनं त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे बोट दाखवून ती म्हणाली: “हा नासोरी येशूबरोबर होता.” त्यावर पेत्रानं शपथ घेऊन म्हटलं: “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” (मत्त. २६:६९-७२; मार्क १४:६६-६८) पेत्रानं दुसऱ्यांदा येशूला नाकारल्यानंतर कदाचित कोंबडा आरवल्याचं त्यानं ऐकलं असेल. पण, तो इतका गोंधळून गेला होता, की येशूनं केवळ काही तासांपूर्वी केलेली भविष्यवाणीसुद्धा त्याला आठवेनाशी झाली होती.

१६ पेत्र अजूनही लोकांच्या नजरा चुकवण्याची धडपड करत होता. पण, अंगणात जवळच उभ्या असलेल्या लोकांच्या एका घोळक्यानं त्याला पाहिलं. त्यांच्यापैकी एक जण मल्खाचा म्हणजे पेत्रानं ज्याला जखमी केलं होतं त्याचा नातलग होता. तो पेत्राला म्हणाला: “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” हे खोटं आहे हे पेत्राला कसंही करून त्याला पटवून द्यायचं होतं. त्यामुळं त्यानं शपथ घेतली आणि आपण जर खोटं बोलत असू तर आपल्याला शाप लागावा, असंही तो म्हणाला. अशा रीतीनं, पेत्रानं तिसऱ्यांदा येशूला नाकारलं. त्याचे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच दुसऱ्यांदा कोंबडा आरवल्याचं त्याला ऐकू आलं.—योहा. १८:२६, २७; मार्क १४:७१, ७२.

“प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली”

१७, १८. (क) आपण किती मोठी चूक करून बसलो हे पेत्राच्या लक्षात आल्यावर काय घडलं? (ख) पेत्रानं कदाचित काय विचार केला असेल?

१७ त्याच क्षणी येशू गच्चीत आला. तिथून अंगणातलं दृश्य स्पष्ट दिसत होतं. अध्यायाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे येशूची आणि पेत्राची नजरानजर झाली. आपण किती मोठी चूक करून बसलो आहोत हे पेत्राच्या लक्षात आलं. मनात दाटलेल्या अपराधीपणाच्या भावना असह्य झाल्यामुळे तो अंगणाबाहेर निघून गेला. पौर्णिमेची रात्र सरत आली होती. जेरूसलेमच्या रस्त्यांवरून एकटाच चाललेल्या पेत्राचे डोळे भरून आले. त्याला समोरचं काहीच दिसेनासं झालं. शेवटी, त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो हमसून-हमसून रडू लागला.—मार्क १४:७२; लूक २२:६१, ६२.

१८ एखाद्या व्यक्तीच्या हातून गंभीर चूक होते तेव्हा आपण क्षमा मिळवण्याच्या लायकीचे नाही असं तिला वाटू शकतं. कदाचित पेत्रानेही विचार केला असेल, आपण केलेल्या भयंकर चुकीची आपल्याला कधी क्षमा मिळू शकेल का? खरंच, त्याला क्षमा मिळणार होती का?

पेत्राला क्षमा मिळणं शक्य होतं का?

१९. आपण केलेल्या चुकीबद्दल पेत्राला कसं वाटलं असेल, पण तो निराशेच्या आहारी गेला नाही हे कशावरून म्हणता येईल?

१९ दिवस उजाडला आणि दिवसभरात एकेक घटना घडत गेली तसा पेत्र आणखीनच दुःखी झाला असेल. त्या दिवशी, कित्येक तास यातना सोसून शेवटी येशूचा मृत्यू झाला तेव्हा पेत्रानं स्वतःला किती दोष दिला असेल! मानव या नात्यानं, पृथ्वीवरील येशूच्या शेवटच्या दिवशी त्यानं जे काही सोसलं त्यात आपणही भर घातली, या नुसत्या विचारानेही पेत्राच्या मनाला किती यातना झाल्या असतील. हे खरं आहे, की तो अतिशय दुःखी झाला होता. पण, तो निराशेच्या आहारी गेला नाही. हे कशावरून म्हणता येईल? कारण, या घटनेच्या थोड्याच वेळानंतर तो पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींच्या सहवासात असल्याचं आपण वाचतो. (लूक २४:३३) त्या भयंकर रात्री आपण येशूसोबत ज्या प्रकारे वागलो त्याचा सर्वच प्रेषितांना पस्तावा झाला असेल आणि त्यांनी नक्कीच एकमेकांचं सांत्वन केलं असेल.

२०. पेत्रानं घेतलेल्या सुज्ञ निर्णयावरून आपण काय शिकू शकतो?

२० आपल्या बांधवांच्या सहवासात राहण्याचा जो निर्णय पेत्रानं घेतला तो नक्कीच एक सुज्ञ निर्णय होता. देवाच्या एखाद्या सेवकाकडून कितीही मोठी चूक झाली, तरीसुद्धा स्वतःला सावरून पुढं वाटचाल करण्याचा दृढनिश्चय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. (नीतिसूत्रे २४:१६ वाचा.) पेत्र अतिशय दुःखी असला, तरी आपल्या बंधुभगिनींच्या सहवासात राहून त्यानं खरा विश्वास दाखवला. एखाद्या व्यक्तीच्या मनात दुःखाचं, अपराधीपणाचं असह्य ओझं असतं, तेव्हा कदाचित तिला इतरांना टाळण्याचा मोह होऊ शकतो. पण, असं करणं अतिशय धोकादायक असू शकतं. (नीति. १८:१) त्याऐवजी, आपल्या बंधुभगिनींसोबत राहून आध्यात्मिक बळ मिळवणं केव्हाही चांगलं.—इब्री १०:२४, २५.

२१. बंधुभगिनींच्या सहवासात राहिल्यामुळेच पेत्राला कोणती बातमी समजली?

२१ बंधुभगिनींच्या सहवासात राहिल्यामुळेच, पेत्राला येशूचा मृतदेह कबरेत नसल्याची धक्कादायक बातमी समजली. ज्या गुहेत येशूचा देह ठेवून गुहेचं तोंड बंद करण्यात आलं होतं तिथं पेत्र आणि योहान धावतच गेले. कदाचित पेत्रापेक्षा वयानं लहान असल्यामुळे योहान त्याच्याआधी तिथं पोहचला. पण, गुहेच्या तोंडापाशी ठेवलेला मोठा दगड बाजूला लोटलेला पाहून तो आत जाण्यास कचरला. पेत्र मात्र कचरला नाही. तो धापा टाकतच तिथं आला आणि सरळ गुहेत शिरला. खरोखरच, कबर रिकामी होती!—योहा. २०:३-९.

२२. पेत्राच्या मनातलं दुःख आणि शंका कशामुळे नाहीशा झाल्या असतील?

२२ येशूचं पुनरुत्थान झालं आहे यावर पेत्रानं विश्वास ठेवला का? खरंतर, देवदूतांनी काही विश्वासू स्त्रियांना येशू जिवंत झाल्याची बातमी सांगितली होती. तरीपण, पेत्रानं सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही. (लूक २३:५५–२४:११) पण, दिवस संपत आला तसं पेत्राच्या मनातलं सर्व दुःख, सगळ्या शंका नाहीशा झाल्या होत्या. येशूचं एका शक्तिशाली आत्मिक व्यक्तीच्या रूपात पुनरुत्थान झालं होतं! पुनरुत्थानानंतर तो आपल्या सर्व प्रेषितांना दिसला. पण, त्याआधी तो त्यांपैकी एका प्रेषिताला एकांतात भेटला. तो कोण होता? याविषयी प्रेषितांनी म्हटलं: “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे.” (लूक २४:३४) नंतर प्रेषित पौलानंही, त्या खास दिवसाविषयी असं लिहिलं, की येशू “केफाला, मग बारा जणांना दिसला.” (१ करिंथ. १५:५) केफा आणि शिमोन ही पेत्राचीच नावं. यावरून, येशूने ज्या प्रेषिताला एकांतात दर्शन दिलं तो पेत्रच होता असं म्हणता येईल.

पेत्राच्या हातून बऱ्याच चुका झाल्या, पण आपल्यापैकी असा कोण आहे ज्याला दररोज देवाच्या क्षमेची गरज पडत नाही?

२३. एखाद्याच्या हातून गंभीर चूक झाल्यास त्यानं पेत्राचं उदाहरण का लक्षात घेतलं पाहिजे?

२३ येशू एकांतात पेत्राला भेटला तो क्षण नक्कीच खूप हृदयस्पर्शी असावा. अर्थात, त्या भेटीदरम्यान त्यांच्यात काय बोलणं झालं याबद्दल बायबल काहीच सांगत नाही. पण, आपला प्रिय प्रभू पुन्हा जिवंत झाल्याचं पाहून पेत्राला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! या भेटीमुळं, येशूजवळ आपलं दुःख आणि आपण केलेल्या चुकीबद्दल पस्तावा व्यक्त करण्याची संधी पेत्राला मिळाली असेल. येशूनं आपल्याला क्षमा करावी असं पेत्राला मनापासून वाटत होतं. आणि खरोखरच येशूनं त्याला क्षमा केली, तेही अगदी मोठ्या मनानं. आज आपल्या हातून एखादी गंभीर चूक झाल्यास आपण पेत्राचं उदाहरण लक्षात ठेवू शकतो. आपल्याला क्षमा मिळूच शकणार नाही असा आपण कधीच विचार करू नये. कारण क्षमा करण्याच्या बाबतीत येशूनं आपल्या पित्याचं अनुकरण केलं, जो “भरपूर क्षमा” करण्यास नेहमी तयार असतो.—यश. ५५:७.

क्षमा केल्याचा आणखी पुरावा

२४, २५. (क) पेत्र गालील समुद्रावर मासेमारी करत असताना काय झालं त्याचं वर्णन करा. (ख) दुसऱ्या दिवशी सकाळी येशूनं केलेला चमत्कार पाहून पेत्रानं काय केलं?

२४ येशूनं आपल्या प्रेषितांना गालीलात जायला सांगितलं. तिथं तो पुन्हा त्यांना भेटणार होता. गालीलात पोहचल्यानंतर पेत्र गालील समुद्रावर मासेमारी करायला गेला. इतर काही जणही त्याच्याबरोबर गेले. तिथं गेल्यावर पेत्राला नक्कीच आपले पूर्वीचे दिवस आठवले असतील; शेवटी, त्याचं निम्मंअधिक आयुष्य याच ठिकाणी गेलं होतं. नावेचा तो कर्रकर्र आवाज, नावेवर आदळणाऱ्या लाटा, माशांचं ते खरबरीत जाळं या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी किती ओळखीच्या होत्या! त्या रात्री खूप प्रयत्न करूनही एकही मासा त्यांना सापडला नाही.—मत्त. २६:३२; योहा. २१:१-३.

पेत्रानं लगेच पाण्यात उडी मारली आणि तो पोहत किनाऱ्यावर गेला

२५ पण, पहाटे किनाऱ्यावरून एका मनुष्यानं त्यांना हाक मारली आणि जाळं नावेच्या पलीकडे टाकण्यास सांगितलं. प्रेषितांनी तसंच केलं आणि काय आश्चर्य, जाळ्यात भरपूर मासे आले! त्यांनी चक्क १५३ मासे पकडले होते! किनाऱ्यावर असलेला तो मनुष्य कोण आहे हे पेत्रानं ओळखलं होतं. त्यानं लगेच पाण्यात उडी मारली आणि तो पोहत किनाऱ्यावर गेला. किनाऱ्यावर पोहचल्यावर, येशूनं आपल्या या विश्वासू शिष्यांना कोळशावर भाजलेले मासे आणि भाकरी खायला दिली. मग, त्यानं पेत्राकडे पाहिलं.—योहा. २१:४-१४.

२६, २७. (क) येशूनं पेत्राला तीन वेळा काय करण्याची संधी दिली? (ख) पेत्राला पूर्णपणे क्षमा केल्याचा पुरावा येशूनं कसा दिला?

२६ शिष्यांनी नुकत्याच पकडलेल्या माशांचा ढीग पाहून येशूनं पेत्राला विचारलं, की “यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” पेत्राचं कुणावर जास्त प्रेम आहे, आपल्यावर की मासेमारीच्या व्यवसायावर, हे येशूला जाणून घ्यायचं होतं. ज्याप्रमाणे पेत्रानं तीन वेळा येशूला नाकारलं होतं, त्याचप्रमाणे येशूनं त्याला तीन वेळा सर्वांसमोर आपल्यावरील प्रेमाची खातरी देण्याची संधी दिली. प्रत्येक वेळी जेव्हा पेत्रानं येशूवर प्रेम असल्याचं कबूल केलं, तेव्हा ते प्रेम कसं दाखवावं हे येशूनं त्याला सांगितलं. जीवनात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाच्या सेवेला सर्वाधिक महत्त्व देण्याद्वारे, म्हणजेच ख्रिस्ताच्या कळपाचं अर्थात आपल्या विश्वासू अनुयायांचं पालनपोषण व सांभाळ करण्याद्वारे पेत्रानं हे प्रेम दाखवावं असं येशूनं म्हटलं.—योहा. २१:१५-१७.

२७ अशा प्रकारे येशूनं पेत्राला याची जाणीव करून दिली की तो आणि त्याचा पिता, पेत्राला खूप मौल्यवान समजतात आणि अजूनही त्यांना त्याच्याकडून बरंच काम करून घ्यायचं आहे. पेत्र मंडळीत एक महत्त्वाची भूमिका बजावेल असंही येशूनं सांगितलं. खरंच, येशूनं पेत्राला क्षमा केल्याचा यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता असू शकणार होता! येशूनं पेत्राला दाखवलेली दया त्याच्या मनाला भिडली आणि येशूला त्याला जो धडा द्यायचा होता तो त्यानं मनापासून स्वीकारला.

२८. पेत्र आपल्या नावाला कसा जागला?

२८ पुढं पेत्रानं अनेक वर्षं, त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी विश्वासूपणे पार पाडली. येशूनं आपल्या मृत्यूच्या शेवटल्या रात्री त्याला सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्यानं आपल्या बांधवांचा विश्वास मजबूत केला. (लूक २२:३२) त्यानं अतिशय प्रेमानं आणि धीरानं ख्रिस्ताच्या अनुयायांचं पालनपोषण केलं. शिमोन नावाच्या या मनुष्याला येशूनं पेत्र किंवा खडक असं जे नाव दिलं होतं, त्याला तो पूर्णपणे जागला. खडकाप्रमाणे स्थिर, भक्कम आणि भरवशालायक राहून त्यानं मंडळीतील सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण मांडलं. याचा एक पुरावा म्हणजे, त्यानं लिहिलेली दोन प्रेमळ पत्रे; पुढं ही पत्रे बायबलची दोन मौल्यवान पुस्तके बनली. त्या पत्रांवरूनसुद्धा हेच दिसून येतं, की इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीत येशूनं दिलेला धडा पेत्राच्या मनावर कायमचा कोरला गेला होता.—१ पेत्र ३:८, ९; ४:८ वाचा.

२९. आपण पेत्राच्या विश्वासाचं आणि येशूनं दाखवलेल्या दयेचं अनुकरण कसं करू शकतो?

२९ आपणही हा धडा शिकून घेणं गरजेचं आहे. आपल्या अनेक चुकांसाठी आपण दररोज देवाकडे क्षमा मागतो का? देवानं आपल्याला क्षमा केल्याचं आपण मान्य करतो का? आणि, देवाच्या क्षमेमध्ये आपल्याला शुद्ध करण्याची ताकद आहे यावर आपण भरवसा ठेवतो का? तसंच, आपण इतरांना क्षमा करण्यास तयार असतो का? असं केल्यास, आपण पेत्राच्या विश्वासाचं आणि येशूनं दाखवलेल्या दयेचं अनुकरण करत असू.