व्हिडिओ पाहण्यासाठी

मुलाखत | ॲन्टोनियो डेला गाटा

एका पाळकाने चर्च का सोडलं?

एका पाळकाने चर्च का सोडलं?

नऊ वर्षं रोममध्ये अभ्यास पूर्ण केल्यानंतर ॲन्टोनियो डेला गाटा १९६९ मध्ये पाळक बनले. नंतर ते इटलीमधल्या नेपल्स शहराजवळ असलेल्या एका धार्मिक विद्यालयात (सेमिनरीत) प्रमुख म्हणून सेवा करू लागले. तिथे राहून बराच अभ्यास आणि मनन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कॅथलिक धर्म बायबलवर आधारित नाही. देवाचा शोध घेताना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी सावध राहा!  मासिकातल्या एका मुलाखतीत सांगितलं.

तुमचं बालपण कसं गेलं?

१९४३ साली इटलीमध्ये माझा जन्म झाला. एका छोट्याशा खेड्यात माझं आणि माझ्या भावंडांचं बालपण गेलं. माझे बाबा शेती आणि सुतारकाम करायचे. आमच्या आईवडिलांनी आमच्यावर कॅथलिक धर्माचे संस्कार केले.

तुम्हाला पाळक बनावंसं का वाटलं?

लहान असताना चर्चमध्ये पाळक जे काही सांगायचे, ते ऐकायला मला खूप आवडायचं. त्यांचा तो आवाज ऐकून, चर्चमध्ये होणारे विधी पाहून मी पार भारावून जायचो. म्हणून मी लहानपणीच ठरवलं होतं की मी मोठा झाल्यावर पाळक बनीन. १३ वर्षांचा असताना, माझ्या आईने मला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं. या स्कूलमध्ये लहान मुलांना पाळक बनण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं.

मग या प्रशिक्षणात तुम्ही बायबलचा अभ्यासपण करायचा का?

खरं सांगायचं, तर नव्हतो करत. मी १५ वर्षांचा असताना माझ्या शिक्षकांनी मला शुभवर्तमानांची एक प्रत दिली, ज्यात आपल्याला येशूचं जीवनचरित्र वाचायला मिळतं. मी ते पुस्तक खूप वेळा वाचलं. १८ वर्षांचा झाल्यावर मी रोमला जाऊन पोपच्या अधिकाराखाली असलेल्या विद्यापीठांमधून प्रशिक्षण घेतलं. तिथे मी लॅटिन, ग्रीक, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयांचं शिक्षण घेतलं. आम्ही बायबलमधून तोंडपाठ केलेली वचनं म्हणायचो आणि रविवारी चर्चमध्ये बायबलही वाचलं जायचं. पण प्रत्यक्षात आम्ही कधी बायबलचा अभ्यास केला नाही.

तुम्ही पुढे धार्मिक विद्यालयाचे प्रमुख बनलात. पण तुम्ही स्वतः शिकवायचा का?

माझं काम प्रशासकीय विभागात जास्त होतं. पण कधीकधी मी शिकवायचो.

कॅथलिक धर्मावरचा तुमचा विश्‍वास उडण्यामागचं कारण काय होतं?

तीन गोष्टी होत्या. पहिली तर चर्च राजकारणात भाग घेत होतं. दुसरी ही, की पाळकांची आणि चर्चमधल्या सदस्यांची चुकीची वागणूक खपवून घेतली जायची. तसंच, काही कॅथलिक शिकवणी मला पटत नव्हत्या. उदाहरणार्थ, देव प्रेमळ आहे तरी तो लोकांना मेल्यानंतर कायम यातना कशा काय देऊ शकतो? आपण रोजरी घेऊन तीच ती प्रार्थना म्हणत राहावी अशी खरंच देव आपल्याकडून अपेक्षा करतो का? a

मग नंतर तुम्ही काय केलं?

मी रडून देवाला मदतीसाठी प्रार्थना केली. तसंच, मी इटॅलियन भाषेत नुकतंच प्रकाशित झालेलं कॅथलिक जेरुसलेम बायबल  विकत घेतलं आणि ते वाचू लागलो. एकदा रविवारी सकाळी प्रार्थना संपल्यावर दोन माणसं सेमिनरीमध्ये आली. त्यांनी यहोवाचे साक्षीदार म्हणून स्वतःची ओळख करून दिली. बायबलमधून आमची जवळजवळ एक तासाच्या वर चर्चा झाली. बायबल खऱ्‍या धर्माबद्दल काय म्हणतं यावर आम्ही बरंच बोललो.

त्यांना भेटून तुम्हाला कसं वाटलं?

मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. कारण ते कॅथलिक बायबलमधूनसुद्धा वचनं अगदी सहजपणे उघडून दाखवत होते आणि खूप विश्‍वासाने बोलत होते. नंतर मारियो नावाचे एक बांधव माझ्यासोबत चर्चा करायला येऊ लागले. ते दर शनिवारी सकाळी, ऊन असो वा पाऊस बरोबर नऊ वाजता मला भेटायला सेमिनरीत यायचे. ते हार न मानता विश्‍वासूपणे येतच राहिले.

दुसऱ्‍या पाळकांचं याबद्दल काय म्हणणं होतं?

मी त्यांनाही चर्चेसाठी बोलवायचो, पण त्यांनी कधी बायबल अभ्यासाचं मनावर घेतलं नाही. पण मला ही चर्चा खूप आवडायची. मी बऱ्‍याच नवनवीन गोष्टी शिकत होतो. जसं की, देवाने वाईट गोष्टी आणि दुःख का राहू दिलं आहे? कित्येक वर्षांपासून मी या प्रश्‍नाचं उत्तर शोधत होतो. आणि शेवटी मला ते मिळालं.

चर्चच्या प्रमुखांनी तुम्हाला बायबल अभ्यास करण्यापासून अडवलं का?

१९७५ मध्ये मी माझ्या मतांबद्दल सांगण्यासाठी भरपूर वेळा रोमला गेलो. चर्चच्या प्रमुखांनी माझं मन बदलायचा खूप प्रयत्न केला. पण एकानेही बायबल वापरलं नाही. शेवटी, ९ जानेवारी, १९७६ मध्ये मी रोममध्ये असलेल्या कॅथलिक चर्चच्या मुख्य अधिकाऱ्‍यांना एक पत्र लिहिलं. मी त्यांना सांगितलं की मी कॅथलिक धर्म सोडत आहे. दोन दिवसांनंतर मी सेमिनरी सोडली आणि ट्रेनने प्रवास करून मी पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला जायला निघालो. ते एक संमेलन होतं आणि तिथे बऱ्‍याच मंडळ्यांमधून भाऊबहीण आले होते. मी आजपर्यंत जे पाहिलं आणि अनुभवलं होतं, त्यापेक्षा हे संमेलन खूपच वेगळं होतं. प्रत्येकाच्या हातात बायबल होतं आणि भाषण देणारे जेव्हा वेगवेगळे विषय समजावून सांगत होते, तेव्हा प्रत्येक जण आपआपल्या बायबलमध्ये ते पाहत होता.

तुमच्या घरच्यांनी तुम्हाला यामध्ये साथ दिली का?

नाही, त्यांनी माझा खूप विरोध केला. पण काही काळानंतर मला कळलं की इटलीच्या उत्तरेकडे असलेल्या लोम्बार्डी शहरात माझा एक भाऊ साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत आहे. मी त्याला भेटायला गेलो. तिथल्या साक्षीदारांनी मला त्या शहरात घर आणि नोकरी शोधायला मदत केली. पुढे त्याच वर्षी माझा यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला.

आज मला देवाच्या खूप जवळ आल्यासारखं वाटतं

तुमच्या या निर्णयाचा तुम्हाला कधी पस्तावा होतो का?

कधीच नाही! उलट आज मला देवाच्या खूप जवळ आल्यासारखं वाटतं. कारण मला त्याच्याबद्दल जे माहीत आहे ते कुठल्याही मानवी तत्त्वज्ञानावर किंवा चर्चच्या रुढीपरंपरांवर नाही, तर बायबलवर आधारित आहे. आणि मी ते दुसऱ्‍यांनाही प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्‍वासाने शिकवू शकतो.

a या आणि अशा बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरं बायबल स्पष्टपणे देतं. भेट द्या. ‘बायबलच्या शिकवणी’ याखाली ‘बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं’ या टॅबवर क्लिक करा.