व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणाव कसा कमी कराल?

तणावाचा सामना कसा करता येईल?

तणावाचा सामना कसा करता येईल?

आपल्याला तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करता यावा यासाठी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या म्हणजे, आपलं आरोग्य, इतरांसोबतचं आपलं वागणंबोलणं, आपली ध्येयं आणि आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी. या लेखात असे काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत ज्यांमुळे आपल्याला तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल. इतकंच काय तर तो कमीसुद्धा होण्यासाठी मदत होईल.

उद्याची चिंता करत बसू नका

“उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल.”—मत्तय ६:३४.

अर्थ: आपल्याला रोज काही न काही चिंता असतात. पण उद्याच्या चिंतांबद्दल विचार करून आजच्या चिंतेत भर घालू नका. एका वेळी एकाच दिवसाचा विचार करा.

  • तणावामुळे चिंता वाटू शकते. त्यामुळे पुढे दिलेल्या दोन गोष्टी करून पाहा: पहिली गोष्ट, काही गोष्टींमुळे येणारा तणाव टाळता येत नसल्यामुळे तो ओळखायला शिका. कारण, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांवर खूप विचार करत राहिल्याने आपला तणाव वाढू शकतो. दुसरी गोष्ट, आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण कधीकधी अशा गोष्टींबद्दल चिंता करतो ज्या नंतर घडतही नाहीत.

अवाजवी अपेक्षा ठेवू नका

वरून येणारी बुद्धी समजूतदार असते.—याकोब ३:१७.

अर्थ: आपण सगळ्या गोष्टी अगदी अचूकपणे करू असा विचार करू नका. स्वतःकडून आणि इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.

  • स्वतःच्या मर्यादा ओळखा, वाजवी अपेक्षा ठेवा आणि आपल्या व इतरांच्या क्षमता ओळखा. तुम्ही जर असं केलं तर तुमचा व इतरांचा तणाव कमी होईल. आणि यामुळे तुम्ही स्वतःला व इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत कराल. तसंच, नेहमी गंभीर राहू नका तर खेळीमेळीचं वातावरण तयार करा. काम करताना एखादी चूक होते तेव्हा ती गोष्ट जास्त मनाला लावून घेऊ नका. असं केल्याने तुमचा तणाव कमी होईल.

तणाव येण्याची कारणं ओळखा

“ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.”—नीतिसूत्रे १७:२७.

अर्थ: नकारात्मक भावनांमुळे आपल्याला नीट विचार करायला कठीण जाऊ शकतं, तेव्हा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • तुम्हाला कशामुळे तणाव येतो आणि त्यावर तुमची कशी प्रतिक्रिया असते यावर विचार करा. उदाहरणार्थ, तुम्हाला तणाव येतो तेव्हा तुमचे विचार, भावना आणि वागणं यांकडे लक्ष द्या; तुम्ही त्या लिहूनही ठेवू शकता. तुम्ही तणावात कशी प्रतिक्रिया देता हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे ओळखाल तितकं तुम्हाला त्याचा यशस्वीपणे सामना करणं शक्य होईल. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे तणाव येतो त्या काढून टाकण्याचे उपाय शोधा. पण तुम्हाला तसं करणं शक्य नसेल तर काय? अशा वेळी तुम्ही तुमच्या कामाचं किंवा वेळेचं चांगल्या प्रकारे नियोजन करून काही प्रमाणात तणाव कमी करू शकता.

  • आपला दृष्टिकोन बदला. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे तणाव येतो त्यामुळे कदाचित इतरांना येणार नाही. कारण एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. आता आपण पुढे दिलेल्या तीन सल्ल्यांचा विचार करू या:

    1. १. इतरांच्या हेतूंवर शंका घेऊ नका. कल्पना करा, तुम्ही रांगेत उभे असताना एक व्यक्‍ती मध्येच येऊन तुमच्या पुढे उभी राहते. अशा परिस्थितीत ती व्यक्‍ती चुकीची वागली आहे असा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला वाईट वाटेल. या उलट, असा विचार करा की त्या व्यक्‍तीच्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नव्हतं; तिला काही महत्त्वाचं काम असू शकतं किंवा ती आपल्याच विचारात असल्यामुळे तशी वागली असावी.

    2. २. एखाद्या परिस्थितीची सकारात्मक बाजू पाहण्याचा प्रयत्न करा. दवाखान्यात किंवा बसस्टॉपवर तुम्ही वाट बघत असता तेव्हा तुम्हाला ताण येऊ शकतो. मग अशा वेळी तुम्ही वाचन करू शकता किंवा दुसऱ्‍या काही कामात व्यस्त राहू शकता.

    3. ३. फक्‍त तेवढ्यापुरता विचार करू नका तर पुढचासुद्धा विचार करा. स्वतःला विचारा: ‘आज जी समस्या आहे ती काही दिवसांनी किंवा महिन्यांनी एक मोठी समस्या बनू शकते का?’ कोणत्या समस्या किरकोळ किंवा कमी काळासाठी राहणाऱ्‍या आहेत आणि कोणत्या गंभीर आहेत हे ओळखा.

सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा

“सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व सुव्यवस्थितपणे होऊ द्या.”—१ करिंथकर १४:४०.

अर्थ: कामाचं नियोजन करा.

  • आपल्या जीवनात सर्व गोष्टी काही प्रमाणात व्यवस्थितपणे व्हाव्यात असं आपल्याला वाटतं. पण कामं पुढे ढकलल्यामुळे आपल्याला ती व्यवस्थितपणे करता येऊ शकत नाहीत. आणि यामुळे आपली बरीचशी कामं अर्धवट राहू शकतात. यावर मात करण्यासाठी आता आपण दोन उपाय पाहू या.

    1. १. तुमची परिस्थिती लक्षात घेऊन आराखडा बनवा आणि त्याचं काटेकोरपणे पालन करा.

    2. २. तुम्ही कोणत्या गोष्टींमुळे कामं वेळेवर करत नाही ते ओळखा आणि त्यात सुधार करा.

कामाबद्दल संतुलित आणि योग्य दृष्टिकोन ठेवा

“तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.”—उपदेशक ४:६, ईझी-टू-रीड व्हर्शन

अर्थ: कामाचं व्यसन असलेल्यांसाठी कामच सर्वकाही असतं, पण त्यांना त्याचा फायदा होतोच असं नाही. ज्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सुखी जीवनाचा आनंद लुटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि शक्‍ती उरत नाही.

  • काम आणि पैसा यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा. भरपूर पैसे कमवल्याने आपण जास्त आनंदी होऊ किंवा आपला तणाव कमी होईल असं नसतं. खरंतर याच्या अगदी उलट होऊ शकतं. बायबलच्या एका पुस्तकात, उपदेशक ५:१२ यात म्हटलं आहे, की “धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.” तेव्हा तुमच्याकडे जितकं आहे त्यातच भागवण्याचा प्रयत्न करा.

  • आरामासाठी आणि मनोरंजनासाठी वेळ काढा. तुम्हाला आवडणाऱ्‍या गोष्टी केल्याने तुमचा तणाव कमी होऊ शकतो. पण लक्षात असू द्या की एकाच जागी बसून करमणूक केल्याने जसं की, टिव्ही पाहिल्याने आपला तणाव कमी होणार नाही.

  • मोबाईल, कंप्युटर यांत जास्त वेळ घालवण्याचं आणि त्यांना जास्त महत्त्व देण्याचं टाळा. सतत मोबाईलवर मेसेजेस, ईमेल किंवा इंटरनेटवर सोशल मिडियाच्या वेबसाईट्‌स पाहण्याचं टाळा. घरी आल्यावर अगदी गरज असेल तरच कामासंबंधी आलेले ईमेल बघा.

आपल्या तब्येतीची काळजी घ्या

“शारीरिक प्रशिक्षण . . . उपयोगी आहे.”—१ तीमथ्य ४:८.

अर्थ: नियमितपणे व्यायाम केल्याने तब्येत चांगली राहते.

  • व्यायाम व शारीरिक हालचाल केल्याने आपल्याला प्रसन्‍न वाटू शकतं आणि आपण तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो. निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी लावा. तसंच पौष्टिक अन्‍न खा आणि वेळच्या वेळी जेवा. पुरेसा आराम मिळेल याकडे लक्ष द्या.

  • सिगारेट, ड्रग्स किंवा अती प्रमाणात दारू पिणं हे तणाव दूर करण्याचे घातक ‘पर्याय’ टाळा. याचे भयानक परिणाम सुरुवातीला नाही तर पुढे दिसून येतात. यामुळे तणाव आणखी वाढू शकतो आणि तुमची तब्येत खराब होऊ शकते. तसंच, तुम्ही मेहनतीने कमवलेला पैसासुद्धा पाण्यात जाऊ शकतो.

  • तुमचा तणाव जास्त वाढला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतील असा विचार करून डॉक्टरांची मदत घ्यायला कचरू नका.

तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे ठरवा

“कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”—फिलिप्पैकर १:१०.

अर्थ: कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं ते ठरवा.

  • तुमच्या कामांची यादी बनवा आणि त्यांना त्यांच्या महत्त्वानुसार क्रम द्या. असं केल्यावर तुम्हाला महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला मदत होईल. यामुळे कोणती कामं नंतर करायची, कोणती इतरांना सोपवायची किंवा कोणती करण्याची गरज नाही हे तुम्ही ठरवू शकाल.

  • एका आठवड्यासाठी नोंद करा की तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा करत आहात. यानंतर तो आणखी चांगल्या प्रकारे कसा वापरता येईल याचा विचार करा. तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन जितकं व्यवस्थितपणे कराल तितका तुम्हाला कमी ताण जाणवेल.

  • आराम करण्यासाठी वेळ काढा. काम करताना अधूनमधून विश्रांती घेतली तर तुम्हाला पुन्हा काम करण्याचा उत्साह येईल आणि यामुळे तुमचा तणाव कमी होईल.

इतरांची मदत घ्या

“मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.”—नीतिसूत्रे १२:२५.

अर्थ: इतर जण जेव्हा आपल्याशी प्रेमळपणे आणि दयाळूपणे बोलतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं.

  • तुम्हाला समजून घेईल अशा व्यक्‍तीशी बोला. ती तुम्हाला एखाद्या परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करू शकते आणि कदाचित असा उपाय सुचवू शकते जो तुमच्या लक्षात आला नसेल. खरंतर, एका भरवशालायक व्यक्‍तीला आपल्या मनातल्या भावना सांगितल्यामुळे तुमचं मन हलकं होऊ शकतं आणि यामुळे तुम्हाला बरं वाटू शकतं.

  • मदत मागा. तुमच्याकडे कदाचित बरीच कामं असतील. मग त्यांपैकी काही कामं करायला तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता का?

  • तुमच्यासोबत काम करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीमुळे तुम्हाला तणाव येत असेल तर तुम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी मार्ग शोधू शकता. जसं की, तुम्ही त्या व्यक्‍तीला विचारपूर्वक आणि प्रेमळपणे सांगू शकता की तिच्या वागण्याबोलण्यामुळे तुम्हाला कसं वाटतं. (नीतिसूत्रे १७:२७) असं करूनही जर परिस्थिती सुधारली नाही तर तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवण्याचं कमी करू शकता.

देवाचं मार्गदर्शन स्वीकारा

“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”—लूक ११:२८.

अर्थ: अन्‍न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींसोबत मानवांची आणखी एक गरज आहे. ती म्हणजे देवाकडून मार्गदर्शन मिळवणं. असं केल्यामुळे आपलं त्याच्यासोबत चांगलं नातं तयार होऊ शकतं. सुखी राहण्यासाठी आपल्याला या गरजेची जाणीव असली पाहिजे आणि आपण ती पूर्णही केली पाहिजे.

  • प्रार्थना केल्यामुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते. देव आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या “सर्व चिंता” त्याच्यावर टाकून दिल्या पाहिजेत कारण त्याला आपली “काळजी” आहे. (१ पेत्र ५:७) प्रार्थना आणि प्रोत्साहनदायक गोष्टींवर विचार केल्यामुळे आपल्याला मनाची शांती मिळेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.

  • देवासोबत तुमचं नातं मजबूत होईल अशा गोष्टी वाचा. या नियतकालिकात दिलेली तत्त्वं बायबलवर आधारित आहेत. खरंतर, देवाकडून मार्गदर्शन मिळवून आपलं त्याच्यासोबत एक चांगलं नातं असणं ही आपली गरज पूर्ण करण्यासाठी बायबल लिहिण्यात आलं आहे. यामुळे “चातुर्य व विवेक” या गोष्टीसुद्धा वाढतात. (नीतिसूत्रे ३:२१) तुम्हीसुद्धा बायबल वाचण्याचं ध्येय ठेवू शकता. आणि याची सुरुवात तुम्ही नीतिसूत्रे या बायबलमधल्या पुस्तकापासून करू शकता.