व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ताइवानमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ताइवानमध्ये

सध्या ३५ च्या आसपास वय असलेले चूंग क्यूंग आणि जूली हे जोडपे पाच वर्षांआधी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात पायनियर म्हणून सेवा करत होते. चूंग क्यूंग आठवून सांगतो: “आम्ही अर्धवेळेची नोकरी करायचो आणि आमचं अगदी व्यवस्थित चाललं होतं. आम्ही जिथं राहत होतो ते अतिशय सुरेख हवामान असलेलं ठिकाण होतं आणि आम्ही अगदी आरामशीर जीवन जगत होतो. आमच्या नातेवाइकांच्या व मित्रांच्या सहवासात राहणं आम्हाला खूप आवडायचं.” असे असूनही चूंग क्यूंग आणि जूली यांचे मन त्यांना खात होते. असे का? कारण यहोवाची आणखी जास्त प्रमाणात सेवा करणे आपल्याला शक्य आहे हे त्यांना माहीत होते. पण त्यासाठी आवश्यक असलेले बदल करण्यास ते मागेपुढे पाहत होते.

त्यानंतर, २००९ सालच्या अधिवेशनात झालेल्या एका भाषणाचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. यहोवाची आणखी जास्त प्रमाणात सेवा करणे ज्यांना शक्य आहे अशांना उद्देशून ते भाषण देण्यात आले होते. वक्त्याने म्हटले: “एक वाहनचालक आपले वाहन डावीकडे किंवा उजवीकडे तेव्हाच वळवू शकतो, जेव्हा वाहन चालू असते. त्याच प्रकारे, आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले, तरच येशू आपल्याला आपले प्रचार कार्य वाढवण्यासाठी मार्गदर्शित करू शकतो.” * वक्ता जणू आपल्याशीच बोलत आहे असे या जोडप्याला वाटले. त्याच अधिवेशनात एका मिशनरी जोडप्याची मुलाखतदेखील घेण्यात आली. हे जोडपे ताइवानमध्ये सेवा करत होते आणि त्या ठिकाणी ते सेवाकार्यात किती आनंद अनुभवत आहेत याविषयी त्यांनी श्रोत्यांना सांगितले. तसेच, तेथे आणखी प्रचारकांची गरज आहे यावरही त्यांनी जोर दिला. पुन्हा, चूंग क्यूंग आणि जूली यांना असे वाटले की हे शब्द त्यांनाच उद्देशून आहेत.

जूली सांगते, “त्या अधिवेशनानंतर, आम्ही ताइवानमध्ये जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेण्यासाठी धैर्य द्यावे अशी यहोवाकडे प्रार्थना केली.” ती पुढे म्हणते: “पण आमच्या मनात भीती होती. जणू खोल पाण्यात आम्ही पहिल्यांदाच उडी मारणार आहोत असं आम्हाला वाटत होतं.” उपदेशक ११:४ या वचनामुळे त्यांना हा निर्णय घेण्यासाठी मदत झाली. त्यात म्हटले आहे: “जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी  करणार नाही.” चूंग क्यूंग म्हणतो: “आम्ही ठरवलं की आता फक्त ‘पाहत बसायचं’ नाही, तर सरळ ‘पेरणीच्या आणि कापणीच्या’ कामाला लागायचं.” ते सतत यहोवाजवळ प्रार्थना करत राहिले आणि त्यांनी अनेक मिशनऱ्यांच्या जीवन कथा वाचल्या. तसेच, जे आधीच ताइवानमध्ये राहायला गेले आहेत अशा अनेकांकडून त्यांनी ईमेलद्वारे माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी त्यांचे फर्निचर, कार इत्यादी विकले आणि फक्त तीन महिन्यांनंतर ते ताइवानमध्ये राहायला आले.

प्रचार कार्याचा आनंद चाखणे

सध्या इतर देशांतून आलेले १०० पेक्षा जास्त बंधुभगिनी ताइवानमध्ये जास्त गरज असलेल्या भागांत सेवा करत आहेत. त्यांचे वय २१ ते ७३ यामध्ये आहे आणि ते ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जपान, कोरिया, स्पेन आणि अमेरिका या देशांतून आले आहेत. त्यांच्यामध्ये ५० पेक्षा जास्त अविवाहित बहिणी आहेत. या आवेशी बांधवांना आणि बहिणींना परकीय देशात जाऊन सेवा करण्यासाठी कशामुळे मदत झाली आहे?

लॉरा

कॅनडाहून आलेली लॉरा नावाची अविवाहित बहीण आता पश्‍चिम ताइवानमध्ये पायनियर सेवा करत आहे. पण जवळजवळ दहा वर्षांपूर्वी तिला प्रचार कार्य मुळीच आवडायचे नाही. लॉरा सांगते, “मी सेवाकार्यात खूप कमी वेळ घालवायचे आणि त्यामुळे मला त्यात आनंद मिळायचा नाही.” नंतर कॅनडातील काही बंधुभगिनींनी तिला त्यांच्यासोबत मेक्सिकोत येऊन एका महिन्यासाठी प्रचार करण्याविषयी सुचवले. ती सांगते: “मी पहिल्यांदाच सेवाकार्यात इतका वेळ खर्च केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्यातून खूप आनंद मिळाला.”

या आनंददायी अनुभवामुळे लॉरा कॅनडातील परकीय भाषिक मंडळीत जाऊन सेवा करण्याविषयी विचार करू लागली. तिने चिनी भाषा शिकण्यासाठी क्लास लावला, चिनी भाषिक गटासोबत ती सेवा करू लागली, आणि ताइवानमध्ये जाऊन सेवा करण्याचे ध्येय तिने ठेवले. २००८ च्या सप्टेंबर महिन्यात तिने तिचे ध्येय गाठले. लॉरा म्हणते: “या नवीन ठिकाणाशी जुळवून घ्यायला मला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण आता मात्र मी कॅनडाला परत जाण्याचा विचारही करू शकत नाही.” आता तिला प्रचार कार्याविषयी कसे वाटते? ती म्हणते: “आता मला प्रचार कार्यात खरा आनंद मिळतो. यहोवाला जाणून घेतल्यानंतर बायबल विद्यार्थी जेव्हा जीवनात बदल करतात तेव्हा ते पाहून खूप समाधान वाटतं. ताइवानमध्ये सेवा करत असल्यामुळे मला अनेक वेळा हे अनुभवण्याची संधी मिळाली आहे.”

 भाषेच्या समस्येवर मात

ब्रायन आणि मिशेल

३५ च्या आसपास वय असलेले ब्रायन आणि मिशेल हे जोडपे आठ वर्षांपूर्वी अमेरिकेहून ताइवानमध्ये राहायला आले. सेवाकार्यातील आपले योगदान खूप कमी आहे असे त्यांना सुरुवातीला वाटले. पण एका अनुभवी मिशनरी बांधवाने त्यांना सांगितले: “तुम्ही फक्त एक पत्रिका जरी एखाद्याला दिली, तरी हे लक्षात ठेवा की त्या व्यक्तीला कदाचित पहिल्यांदाच यहोवाबद्दल काही माहिती मिळाली असेल. याचा अर्थ, तुम्ही नक्कीच सेवाकार्यात महत्त्वाचं योगदान देत आहात.” बांधवाच्या या उत्तेजनामुळे ब्रायन आणि मिशेल यांचा उत्साह वाढला. आणखी एका बांधवाने त्यांना सांगितले: “चिनी भाषा शिकण्यात तुम्ही किती प्रगती केली आहे हे दररोज तपासून पाहू नका. नाहीतर तुम्ही निराश व्हाल. त्याऐवजी प्रत्येक संमेलनात हे तपासून पाहा की मागच्या संमेलनाच्या तुलनेत आपण कितपत प्रगती केली आहे.” आणि खरोखरच त्या दोघांनी चांगली प्रगती केली. आज ते प्रभावशाली पद्धतीने पायनियर सेवा करत आहेत.

परकीय भाषा शिकण्याचे आव्हान स्वीकारण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळू शकेल? ज्या देशात जाऊन सेवा करण्याची तुमची इच्छा आहे त्या देशाला भेट द्या. तेथे सभांना उपस्थित राहा, स्थानिक बंधुभगिनींशी मैत्री करा आणि त्यांच्यासोबत प्रचार कार्याला जा. ब्रायन म्हणतो: “इतके लोक राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देत आहेत हे जेव्हा तुम्ही पाहता आणि बंधुभगिनींचं प्रेम अनुभवता, तेव्हा दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याचं आव्हान स्वीकारण्यास तुम्ही प्रेरित होता.”

स्वतःच्या गरजा कशा भागवतात?

क्रिस्टन आणि मिशेल

ताइवानमध्ये जास्त गरज असलेल्या ठिकाणी पायनियर म्हणून सेवा करत असलेल्यांपैकी बरेच जण इंग्रजी शिकवण्याद्वारे स्वतःचा खर्च भागवतात. क्रिस्टन आणि मिशेल हे मासे विकण्याचे काम करतात. क्रिस्टन म्हणतो: “मी हे काम यापूर्वी कधी केलेलं नाही. पण या कामामुळे आम्हाला या देशात राहून आमच्या गरजा भागवणं शक्य झालं आहे.” काही काळातच बरेच लोक क्रिस्टनचे नेहमीचे गिऱ्हाईक झाले. या अर्धवेळेच्या कामामुळे त्याला स्वतःच्या आणि त्याच्या पत्नीच्या गरजा भागवता येतात. तसेच, यामुळे त्यांना त्यांच्या प्रमुख कामासाठी अर्थात पायनियर सेवेसाठी भरपूर वेळ मिळतो.

“प्रवासाचाही आनंद लुटा”

विलियम आणि जेनिफर हे जोडपे सुमारे सात वर्षांआधी अमेरिकेहून ताइवानमध्ये राहायला आले. विलियम म्हणतो: “भाषा शिकणं, पायनियर सेवा करणं, मंडळीच्या जबाबदाऱ्या सांभाळणं आणि स्वतःच्या गरजा भागवणं कधीकधी खूप कठीण जातं.” मग, सेवा करत राहण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत झाली आहे? ते सहसा अशी ध्येये ठेवण्याचा प्रयत्न करतात जी त्यांना सहज गाठता येतील. उदाहरणार्थ, चिनी भाषा शिकत असताना त्यांनी अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्यामुळे, जेव्हा त्यांना ती शिकण्यास वेळ लागला तेव्हा ते निराश झाले नाहीत.

विलियम आणि जेनिफर

एका प्रवासी पर्यवेक्षकांनी विलियमला असे सांगितले होते, की “एखाद्या स्थळी पोचण्यातच फक्त आनंद मानू नका, तर तिथवरच्या प्रवासाचाही आनंद लुटा.” त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ होता, की एखादे आध्यात्मिक ध्येय ठेवल्यानंतर ते मिळवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यांतूनही तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. विलियम सांगतो की त्यांच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे त्याला व त्याच्या पत्नीला बदल करण्यासाठी तयार असण्यास मदत झाली आहे. तसेच स्थानिक मंडळीतील जबाबदार बांधवांच्या सूचना स्वीकारण्यास आणि आवश्यक फेरबदल करण्यासही त्यांना मदत झाली आहे. यामुळे एका नवीन देशात आपल्या सेवेत यशस्वी होणे त्यांना शक्य झाले आहे. विलियम पुढे म्हणतो, “तसंच, ज्या बेटावर आम्ही सेवा करत आहोत तिथल्या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही काही वेळ आम्ही काढला पाहिजे याची आम्हाला जाणीव झाली आहे.”

अमेरिकेची मेगन नावाची एक अविवाहित पायनियर बहीणदेखील विलियम आणि जेनिफर यांच्याप्रमाणे चिनी भाषा शिकत आहे. हे ध्येय गाठण्याच्या तिच्या ‘प्रवासाचा तीही आनंद घेत आहे.’ प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ती प्रचारकांच्या एका गटासोबत काउशयुंग नावाच्या बंदरावर प्रचार करण्यासाठी जाते. हे ताइवानमधील सर्वात मोठे बंदर असून खूप सुंदर ठिकाण आहे. बंदरावर उभ्या असलेल्या जहाजांतील खलाश्यांना मेगन प्रचार करते. हे खलाशी बांग्लादेश, भारत, इंडोनेशिया, फिलिपीन्झ, थायलंड आणि वानवातू येथून येतात. ती म्हणते: “हे खलाशी फक्त थोड्या काळासाठी या बंदरावर असतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत लगेच बायबल अभ्यास सुरू करतो. जास्तीत जास्त लोकांसोबत अभ्यास करता  यावा म्हणून मी एका वेळी चार किंवा पाच लोकांसोबत बायबल अभ्यास करते.” चिनी भाषा शिकण्याबद्दल काय? ती सांगते: “मला ती लवकर शिकता आली असती तर बरं झालं असतं. पण, एका बांधवानं मला जे सांगितलं ते मी नेहमी लक्षात ठेवते. ते म्हणाले होते, ‘तुमच्या परीनं होता होईल तितकं करा आणि बाकीचं यहोवावर सोडून द्या.’”

मेगन

सुरक्षित, साधे आणि रोमांचक जीवन

ब्रिटनच्या कॅथी हिने, दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेण्याआधी अविवाहित बहिणींसाठी कोणते ठिकाण सुरक्षित राहील याबद्दल बरीच माहिती मिळवली. तिने प्रार्थनेत यहोवाजवळ आपल्या चिंता व्यक्त केल्या. तसेच, तिने अनेक शाखा कार्यालयांना पत्र लिहून याबद्दल माहिती मिळवली. त्यानंतर तिला मिळालेल्या उत्तरांचे तिने नीट परीक्षण केले आणि ताइवान हे ठिकाण योग्य ठरेल अशा निष्कर्षावर ती पोचली.

२००४ साली ३१ वर्षांची असताना कॅथी ताइवानमध्ये राहायला आली. तेथे ती शक्य तितक्या साध्या पद्धतीने जीवन जगत आहे. ती म्हणते: “मी इथल्या बांधवांना आणि बहिणींना, कमी भावात फळं आणि भाज्या कुठं मिळतील हे विचारलं. आणि त्यांच्या चांगल्या सल्ल्यामुळे मला बरीच बचत करणं शक्य झालं.” साधेपणाने जगण्यास तिला कशामुळे मदत होते? कॅथी सांगते: “माझं जेवण आणि कपडे अगदी साधे असले, तरी त्यात समाधानी राहण्यास मी यहोवाजवळ नेहमी मदत मागते आणि यहोवा माझ्या प्रार्थनांचं उत्तर देत आहे हे मला जाणवतं. मला खरोखर कोणत्या गोष्टींची गरज आहे हे तो माझ्या लक्षात आणून देतो आणि ज्या गोष्टी माझ्याजवळ नाहीत त्यांबद्दल वाईट वाटून न घेण्यास मला मदत करतो.” ती पुढे म्हणते: “मला माझं साधं राहणीमान आवडतं कारण त्यामुळे मी आध्यात्मिक गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करू शकते.”

कॅथी

कॅथीचे जीवन फक्त साधेच नाही तर रोमांचकही आहे. याचे कारण ती सांगते: “मला अशा क्षेत्रात प्रचार करण्याची संधी मिळाली आहे जिथं बरेच लोक सुवार्तेला चांगला प्रतिसाद देतात. हे पाहून खरंच खूप आनंद होतो!” ती ताइवानमध्ये आली, तेव्हा ती सेवा करत असलेल्या शहरात फक्त दोन चिनी भाषिक मंडळ्या होत्या. पण आज तेथे सात मंडळ्या आहेत. याबद्दल कॅथी असे म्हणते: “ही अप्रतिम वाढ स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं आणि कापणीच्या कार्यात स्वतः सहभाग घेणं खरंच खूप रोमांचक आहे. मला दररोज अनेक चांगले अनुभव येतात.”

“माझ्यासारख्याचाही त्यांनी उपयोग केला”

सुरुवातीला उल्लेखण्यात आलेले चूंग क्यूंग आणि जूली यांचे सेवाकार्य आता कसे चालले आहे? चूंग क्यूंगला आधी असे वाटले होते की चिनी भाषा येत नसल्यामुळे तो मंडळीत जास्त काही योगदान देऊ शकणार नाही. पण याबद्दल स्थानिक बांधवांचे मत वेगळे होते. चूंग क्यूंग सांगतो: “जेव्हा आमच्या मंडळीच्या दोन मंडळ्या करण्यात आल्या तेव्हा सेवा सेवक या नात्यानं माझ्यावर आणखी कितीतरी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्या वेळी मला हे जाणवलं की मी खरंच जास्त गरज असलेल्या क्षेत्रात काम करत आहे.” तो हसून असे म्हणतो, “माझ्यासारख्याचाही त्यांनी उपयोग केला, यावरूनच तुम्ही समजू शकता की तिथं किती गरज होती!” आज तो मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे. जूली म्हणते: “आम्ही पूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं इतकं समाधान आणि आनंद आम्ही अनुभवत आहोत. खरंतर आम्ही इथल्या लोकांना मदत करण्यासाठी आलो होतो, पण या रोमांचक अनुभवामुळे उलट आम्हालाच मदत झाली आहे असं आम्हाला वाटतं. इथं सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही यहोवाचे खूप आभारी आहोत.”

अनेक देशांत अजूनही अशा प्रचारकांची आवश्यकता आहे जे जास्त गरज असलेल्या क्षेत्रांत जाऊन सेवा करू शकतील. तुमचे शिक्षण संपत आले आहे का, आणि जीवनात पुढे काय करायचे याचा तुम्ही विचार करत आहात का? तुम्ही अविवाहित आहात का आणि यहोवाची जास्त सेवा करण्याची तुमची इच्छा आहे का? तुमच्या कुटुंबाने यहोवाच्या सेवेचा आनंद लुटावा अशी तुमची इच्छा आहे का? तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात का आणि तुमच्या मौल्यवान अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा असे तुम्हाला वाटते का? असे असल्यास गरज असलेल्या ठिकाणी जाऊन यहोवाची आणखी जास्त प्रमाणात सेवा करण्याचा निर्णय घ्या. असे केल्यास अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

^ परि. 3 टेहळणी बुरूज १५ जानेवारी २०१२, पृष्ठ १० परिच्छेद ७, ८ पाहा.