व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता

तुम्ही देवाशी संवाद साधता का?

तुम्ही देवाशी संवाद साधता का?

जिवलग मित्र वेळोवेळी एकमेकांशी प्रत्यक्ष बोलतात किंवा फोन, इ-मेल, व्हिडिओ अथवा पत्र यांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. देवाशी घनिष्ठ मैत्री करायची असेल, तर त्याच्याशी वेळोवेळी संवाद साधणे गरजेचे आहे. आपण हे कसे करू शकतो?

आपण प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलू शकतो. पण, देवाला प्रार्थना करणे म्हणजे एखाद्या मित्राबरोबर आपण जशा इकडच्या-तिकडच्या गप्पा मारतो तसे नाही. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्या निर्माणकर्त्याशी म्हणजे विश्वाच्या सार्वभौम सत्ताधाऱ्याशी बोलत असतो. त्यामुळे, आपण गाढ आदराने त्याला प्रार्थना केली पाहिजे. देवाने आपली प्रार्थना ऐकावी अशी इच्छा असल्यास काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांपैकी तीन गोष्टी आपण विचारात घेऊ या.

पहिली गोष्ट म्हणजे, आपण केवळ आणि केवळ यहोवा देवालाच प्रार्थना केली पाहिजे; येशूला किंवा एखाद्या संताला अथवा मूर्तीला नव्हे. (निर्गम २०:४, ५) बायबल स्पष्ट शब्दांत असे म्हणते: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पैकर ४:६) दुसरी गोष्ट म्हणजे, देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या नावाने आपण प्रार्थना केली पाहिजे. स्वतः येशूने असे म्हटले: “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या प्रार्थना नेहमी देवाच्या इच्छेनुसार असल्या पाहिजेत. बायबल म्हणते: “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” *१ योहान ५:१४.

जिवलग मित्र वेळोवेळी एकमेकांशी संवाद साधतात

अर्थात, दोन मित्रांपैकी एकच मित्र नेहमी बोलत असेल, तर त्यांची मैत्री जास्त दिवस टिकणार नाही. त्यासाठी दोघांनीही संभाषण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपणसुद्धा देवाला आपल्याशी बोलू दिले पाहिजे आणि तो बोलत असतो तेव्हा त्याचे बोलणे ऐकले पाहिजे. देव आपल्याशी कसा बोलतो हे तुम्हाला माहीत आहे का?

आज यहोवा देव त्याच्या लिखित वचनाद्वारे म्हणजे बायबलद्वारे आपल्याशी ‘बोलतो.’ (२ तीमथ्य ३:१६, १७) असे का म्हणता येईल? अशी कल्पना करा, की तुम्हाला तुमच्या जिवलग मित्राचे पत्र आले आहे. पत्र वाचल्यावर तुम्ही म्हणता: “माझा मित्र म्हणाला, की तो मला भेटायला येतोय.” अर्थात, तुमचा मित्र प्रत्यक्ष तुमच्याशी बोलला नाही; तो लिखित स्वरूपात तुमच्याशी बोलला. त्याचप्रमाणे, तुम्ही बायबलचे वाचन करता तेव्हा तुम्ही यहोवाला तुमच्याशी बोलू देता. म्हणूनच, पहिल्या लेखात उल्लेख करण्यात आलेली जीना म्हणते: “मला देवाला आपला मित्र बनवायचं असेल, तर त्यानं आपल्याला लिहिलेलं ‘पत्र’ अर्थात बायबल मी वाचलंच पाहिजे.” पुढे ती म्हणते की, “बायबलचं रोज वाचन केल्यामुळं देवासोबतची माझी मैत्री आणखी घट्ट झाली आहे.” तुम्हीसुद्धा, दररोज बायबलचे वाचन करण्याद्वारे यहोवाला रोज तुमच्याशी बोलू देता का? असे केल्यास, देवासोबतची तुमची मैत्री घनिष्ठ होईल. (w14-E 12/01)

^ परि. 5 प्रार्थनेद्वारे देवाशी घनिष्ठ नातेसंबंध कसा जोडता येईल यावरील अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील अध्याय १७ पाहा.