व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता

तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का, आणि तुम्ही त्याचा उपयोग करता का?

तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का, आणि तुम्ही त्याचा उपयोग करता का?

तुमचा एक जिवलग मित्र आहे पण त्याचे नावच तुम्हाला माहीत नाही असे कधी होऊ शकते का? शक्यच नाही. बल्गेरियातील ईरीना नावाच्या एका स्त्रीने जे म्हटले ते किती खरे आहे! तिने म्हटले, “आपल्याला जर देवाचं नाव माहीत नसेल, तर त्याच्याशी मैत्री करणं अशक्य आहे.” आनंदाची गोष्ट म्हणजे, आधीच्या लेखात सांगितल्यानुसार आपण देवाशी घनिष्ठ मैत्री करावी अशी त्याची इच्छा आहे. आणि त्यामुळेच बायबलद्वारे त्याने एका अर्थी आपल्याला स्वतःची ओळख करून दिली आहे. त्याने म्हटले: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.”—यशया ४२:८, पं.र.भा.

बायबलद्वारे देवाने एका अर्थी आपल्याला स्वतःची ओळख करून दिली आहे: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.”—यशया ४२:८

आपल्याला देवाचे नाव माहीत आहे की नाही आणि आपण त्याचा उपयोग करतो की नाही यामुळे त्याला काही फरक पडतो का? याचा विचार करा: हिब्रू भाषेत देवाचे नाव चार व्यंजनांनी सूचित करण्यात आले आहे; त्यांना टेट्राग्रॅमटन असे म्हटले जाते. मूळ हिब्रू शास्त्रवचनांत ही चार अक्षरे जवळजवळ ७,००० वेळा आढळतात. बायबलमध्ये इतर कोणत्याही नावापेक्षा सगळ्यात जास्त वेळा देवाचे नाव आढळते. यावरून हेच सिद्ध होते, की आपण यहोवाचे नाव जाणून घ्यावे आणि त्याचा उपयोग करावा अशी त्याची इच्छा आहे. *

सहसा एकमेकांची नावे जाणून घेण्याद्वारे दोन व्यक्तींमधील मैत्रीची सुरुवात होते. तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का?

पण काहींना कदाचित वाटेल, की देव पवित्र व सर्वशक्तिमान आहे त्यामुळे त्याच्या नावाचा उपयोग करण्याद्वारे आपण त्याचा अनादर करू. अर्थात, आपण जसे आपल्या जिवलग मित्राच्या नावाचा कधीही गैरवापर करणार नाही, तसेच देवाच्या नावाचाही आपण गैरवापर करू नये. पण, यहोवाची अशी इच्छा आहे, की जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांनी त्याच्या नावाचा सन्मान करावा व ते नाव इतरांना सांगावे. (स्तोत्र ६९:३०, ३१; ९६:२, ८) येशूने त्याच्या अनुयायांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” देवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्यात आपण सहभाग घेऊ शकतो. तो कसा? इतरांना त्याचे नाव सांगण्याद्वारे. आपण असे करतो तेव्हा देवासोबतची आपली मैत्री घनिष्ठ होते.—मत्तय ६:९.

बायबल म्हणते, की जे देवाच्या “नावाचा सन्मान” करतात त्यांच्याकडे तो विशेष लक्ष देतो. (मलाखी ३:१६, पं.र.भा.) अशा व्यक्तींसंबंधी यहोवा असे अभिवचन देतो: “त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन.” (स्तोत्र ९१:१४, १५) होय, यहोवाशी घनिष्ठ मैत्री करायची असेल, तर त्याचे नाव माहीत असणे व त्याचा उपयोग करणे खूप गरजेचे आहे. (w14-E 12/01)

^ परि. 4 सर्वसामान्यपणे ज्याला जुना करार म्हटले जाते त्या हिब्रू शास्त्रवचनांत देवाचे नाव इतक्या सर्रासपणे आढळत असले, तरी बायबलच्या अनेक भाषांतरांतून ते गाळण्यात आले आहे ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. ही भाषांतरे, देवाच्या नावाऐवजी “प्रभू” किंवा “देव” अशा पदव्यांचा उपयोग करतात. या विषयावरील अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील पृष्ठे १९५-१९७ पाहा.