स्तोत्रं ६८:१-३५

  • देवाच्या शत्रूंची पांगापांग व्हावी

    • “अनाथांचा पिता” ()

    • एकाकी लोकांना देव घर देतो ()

    • स्त्रिया आनंदाचा संदेश घोषित करतात (११)

    • मानवांच्या रूपात भेटी (१८)

    • यहोवा “दररोज आमचं ओझं वाहतो” (१९)

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. स्तुतिगीत. ६८  देवाने उठावं, त्याच्या शत्रूंची पांगापांग व्हावीआणि त्याचा द्वेष करणारे त्याच्यासमोरून पळून जावेत.+  २  वाऱ्‍याने वाहून जाणाऱ्‍या धुराप्रमाणे, तू त्यांना आपल्यापुढून घालवून दे;आगीत मेण वितळतं,तसा दुष्टांचा देवासमोर नाश व्हावा.+  ३  पण नीतिमान लोक आनंद करोत;+ते देवासमोर हर्षित होवोत;ते आनंदाने जल्लोष करोत.  ४  देवासाठी गीत गा; त्याच्या नावाचं गुणगान करा.*+ ओसाड रानांतून* स्वारी करणाऱ्‍या देवासाठी गीत गा. याह* त्याचं नाव आहे!+ त्याच्यासमोर आनंद करा!  ५  आपल्या पवित्र निवासस्थानात राहणारा देव,+अनाथांचा* पिता आणि विधवांचा रक्षक* आहे.+  ६  ज्याचं कोणी नाही, त्याला तो राहायला घर देतो;+तो बंदिवानांना सोडवतो आणि त्यांना समृद्ध करतो.+ पण अडेल वृत्तीच्या* लोकांना रुक्ष प्रदेशात राहावं लागेल.+  ७  हे देवा, तू जेव्हा तुझ्या लोकांना नेलंस,*+जेव्हा वाळवंटातून तू त्यांच्यापुढे चाललास, (सेला )  ८  तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला;+देवामुळे आकाशातून पाऊस पडला;*देवामुळे, इस्राएलच्या देवामुळे, हा सीनाय पर्वत थरथरू लागला.+  ९  हे देवा, तू भरपूर पाऊस पाडलास,तुझ्या थकलेल्या लोकांना* तू ताजंतवानं केलंस. १०  ते तुझ्या छावणीत राहिले;+हे देवा, तुझ्या चांगुलपणामुळे तू गरिबांच्या गरजा भागवल्यास. ११  यहोवा आपल्या लोकांना आज्ञा देतो;आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना आहे.+ १२  राजे आपल्या सैन्यांसोबत पळून जातात;+ ते पळून जातात! घरी राहिलेल्या स्त्रीलाही लुटीतला वाटा मिळतो.+ १३  तुम्हा माणसांना छावणीतल्या शेकोट्यांजवळ* पडून राहावं लागलं,तरी तिथे चांदीने सजलेल्या पंखांचं;शुद्ध* सोन्याची झाक असलेल्या पिसांचं कबुतर असेल. १४  सर्वशक्‍तिमान देवाने देशातल्या राजांची पांगापांग केली,+तेव्हा सल्मोनमध्ये बर्फ पडला.* १५  बाशानचा पर्वत+ देवाचा पर्वत* आहे;बाशानचा पर्वत शिखरांचा पर्वत आहे. १६  शिखरांच्या पर्वतांनो, देवाने ज्याला आपलं निवासस्थान म्हणून निवडलं,*+त्या पर्वताकडे तुम्ही ईर्ष्येने का पाहता? यहोवा खरोखर तिथे सर्वकाळ निवास करेल.+ १७  देवाकडे लढाईचे हजारो-लाखो रथ आहेत.+ यहोवा सीनायमधून पवित्र ठिकाणी आला आहे.+ १८  हे याह, हे देवा, तू उंचावर चढून गेलास;+तू आपल्यासोबत बंदिवानांना नेलंस;तू माणसांच्या रूपात भेटी नेल्यास,+तू अडेल वृत्तीच्या लोकांनाही नेलंस;+त्यांच्यामध्ये राहावं, म्हणून तू त्यांना नेलंस. १९  यहोवाची स्तुती करा; तो दररोज आमचं ओझं वाहतो,+तो आमचं तारण करणारा खरा देव आहे! (सेला ) २०  खरा देव आम्हाला संकटांतून वाचवणारा देव आहे;+सर्वोच्च प्रभू यहोवा आम्हाला मृत्यूपासून सोडवतो.+ २१  देव आपल्या शत्रूंची डोकी फोडेल,जे दुष्टपणा सोडत नाहीत,* त्यांच्या कवट्या तो फोडेल.+ २२  यहोवा म्हणाला: “मी त्यांना बाशानमधून परत आणीन;+मी त्यांना खोल समुद्रातून परत आणीन. २३  म्हणजे तुमचे पाय रक्‍तात भिजतील+ आणि तुमची कुत्री शत्रूंचं रक्‍त चाटतील.” २४  हे देवा, ते तुझ्या मिरवणुका पाहतात. ते पवित्र ठिकाणी जाणाऱ्‍या माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका पाहतात.+ २५  गायक पुढे चालतात, तंतुवाद्यं वाजवणारे त्यांच्यामागे चालतात;+त्यांच्यामध्ये तरुणी डफ वाजवत जातात.+ २६  मोठ्या मंडळीत देवाची स्तुती करा;इस्राएलच्या स्रोतापासून आलेल्यांनो, यहोवाची स्तुती करा.+ २७  तिथे सगळ्यात धाकटा बन्यामीन+ त्यांच्यावर सत्ता गाजवतो,यहूदाचे अधिकारी आणि त्यांचा जल्लोष करणारा समुदाय,जबुलूनचे अधिकारी आणि नफतालीचे अधिकारी हेसुद्धा सत्ता गाजवतात. २८  तू शक्‍तिशाली व्हावं, असा आदेश तुझ्या देवाने दिलाय. हे देवा, तू आमच्या वतीने कारवाई केली आहेस; तुझं सामर्थ्य दाखव.+ २९  यरुशलेममध्ये असलेल्या तुझ्या मंदिरासाठी,+राजे तुझ्याकडे नजराणे* आणतील.+ ३०  लोक नमन करून चांदीचे तुकडे आणत* नाहीत तोपर्यंत,तू लव्हाळ्यांमध्ये* राहणाऱ्‍या जंगली पशूंना,बैलांना+ आणि त्यांच्या वासरांच्या कळपांना दम दे. पण ज्यांना लढाईची आवड आहे, अशा लोकांची तू दाणादाण करतोस. ३१  इजिप्तमधून* कांस्य धातूच्या वस्तू आणल्या जातील;*+कूश देवासाठी भेटी आणण्याची घाई करेल. ३२  पृथ्वीवरच्या राज्यांनो, देवासाठी गीत गा.+ यहोवाचं गुणगान करा.* (सेला ) ३३  तो प्राचीन काळापासून असलेल्या उंचच उंच आकाशावर स्वारी करतो.+ तो आपल्या दमदार आवाजात गर्जना करतो. ३४  देवाचं सामर्थ्य ओळखा.+ इस्राएलवर त्याची सत्ता आहे,त्याचं सामर्थ्य आकाशात* आहे. ३५  देव आपल्या* गौरवशाली मंदिरात विस्मयकारक आहे.+ तो इस्राएलचा देव आहे. तो आपल्या लोकांना शक्‍ती आणि बळ देतो.+ देवाची स्तुती असो!

तळटीपा

किंवा “नावासाठी संगीत रचा.”
किंवा कदाचित, “ढगांवरून.”
“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
किंवा “वडील नसलेल्या मुलांचा.”
शब्दशः “न्यायाधीश.”
किंवा “बंडखोर.”
शब्दशः “लोकांच्या पुढे गेलास.”
शब्दशः “झिरपला.”
शब्दशः “वारसा.”
किंवा कदाचित, “मेंढवाड्यांजवळ.”
किंवा “पिवळट-हिरव्या.”
किंवा “जणू बर्फ पडला.”
किंवा “विशाल पर्वत.”
किंवा “देवाला जे आपलं निवासस्थान म्हणून हवं आहे.”
किंवा “दुष्ट मार्गाने चालत राहतात.”
किंवा “भेटवस्तू.”
किंवा कदाचित, “तुडवत.”
शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.
किंवा कदाचित, “राजदूत येतील.”
किंवा “मिसरमधून.”
किंवा “यहोवासाठी संगीत रचा.”
शब्दशः “ढगांत.”
शब्दशः “तुझ्या.”